बंगळुरू – भारताची पहिली-वहिली सौर मोहीम “आदित्य एल-1’ने (Aditya-L1) आता वैज्ञानिक डेटा (माहिती) गोळा करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, आदित्य एल-1 (Aditya-L1) पुढील महत्त्वाचा टप्पा सुरू करण्यासाठी सज्ज आहे. अंतराळयान सोमवारी मध्यरात्री ट्रान्स लॅग्रॅन्जियन पॉइंट 1 इन्सर्शन (TL1I) मधून जाईल, असे इस्रोनो सांगितले आहे.
ट्रान्स लॅग्रॅल्जियन पॉइंट-1 इन्सर्शन हे पृथ्वीच्या कक्षेचे प्रक्षेपण आहे. जे 19 सप्टेंबर रोजी पहाटे 2 वाजता होईल. यासह, पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील लॅग्रेंज पॉइंट 1 (L1) पर्यंत सुमारे 110 दिवसांचा प्रवास सुरू होईल. सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर 15 लाख किलोमीटर आहे.
इस्रोच्या माहितीनुसार, स्टेप्स उपकरणाच्या सेन्सर्सने पृथ्वीपासून 50,000 किमी पेक्षा जास्त अंतरावरील सुप्रा-थर्मल आणि Ions आणि इलेक्ट्रॉन मोजण्यास सुरुवात केली आहे. हा डेटा शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवतीच्या कणांविषयी विश्लेषण करण्यास मदत करतो, असे इस्रोने सोमवारी सांगितले.
10 सप्टेंबर रोजी पृथ्वीपासून 50,000 किमी पेक्षा जास्त अंतरावर स्टेप्स सक्रिय करण्यात आले. हे अंतर पृथ्वीच्या रेडिएशन बेल्ट क्षेत्राच्या पलीकडे ठेवून पृथ्वीच्या त्रिज्येच्या (रेडियसच्या) आठ पट पेक्षा जास्त आहे.
स्टेप्सच्या सर्व आवश्यक तपासण्या पूर्ण केल्यानंतर, अंतराळयान पृथ्वीपासून 50,000 किमी पुढे जाईपर्यंत डेटा गोळा करणे चालूच होते. स्टेप्सचे प्रत्येक युनिट सामान्य पॅरामीटर्समध्ये कार्यरत आहे असेही इस्रोने सांगितले आहे.
स्टेप्स म्हणजे काय?
स्टेप्स हे सुप्रा थर्मल आणि एनर्जेटिक पार्टिकल स्पेक्ट्रोमीटर इन्स्ट्रुमेंट आहे, जे आदित्य सोलर विंड पार्टिकल एक्सपेरिमेंट (ASPEX) पेलोडचा एक भाग आहे. स्टेप्स मध्ये सहा सेन्सर्स आहेत, प्रत्येक सेन्सर वेगवेगळ्या दिशेने निरीक्षण करतो आणि सुप्रा-थर्मल आणि आयन मोजतो.
कमी आणि उच्च-ऊर्जा कण स्पेक्ट्रोमीटर वापरून हे मोजमाप केले जाते. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या उपस्थितीत असलेल्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यासाठी पृथ्वीच्या कक्षेदरम्यान गोळा केलेला डेटा शास्त्रज्ञांना मदत करणार आहे.