कराड – कराड येथे सुरु असलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे प्रयोग तीन मे पर्यंत होणार होते. परंतु, काल घोडेस्वारीदरम्यान घोड्याचा पाय मुरगळ्याने खा. कोल्हे यांच्या पाठीला दुखापत झाली. त्यानंतर त्यांना पाठीचा त्रास होऊ लागल्याने दोन व तीन मे रोजीचे दोन प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान, आज सोमवार दि. १ मे रोजी सायंकाळी शेवटचा प्रयोग होणार असल्याची माहिती डॉ. कोल्हे यांनी दिली.
शहरात २८ एप्रिल रोजीपासून शिवपुत्र संभाजी महानाट्याचा प्रयोग सुरू होते. त्यादरम्यान घोडेस्वारी करताना डॉ. अमोल कोल्हे यांना पाठीचा त्रास होऊ लागला. त्यांचा त्रास कमी होण्यासाठी फिजीओथेरपीही करण्यात येत होती. मात्र, त्रास कमी होत नसल्याने पुढील दोन शो रद्द करण्यात आले आहेत. त्यानुसार दोन व तीन मे रोजीचे शो रद्द करण्यात आले आहेत.
ज्यांनी दोन आणि तीन तारखेचे तिकिट काढले असेल त्यांची आजच्याच ‘शो’साठी उपस्थित रहावे, त्यांची तिकिटे आज ग्राह्य धरली जाणार आहेत. ज्यांना या कार्यक्रमासाठी येणे शक्य नसेल, त्यांना तिकीटाचे पैसे परत देणार असल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे.