नवी दिल्ली – गाझा पट्ट्यातील खान युनिस शहरातून इस्रायलच्या सैन्याने अल्पश: माघार घेतली आहे. यामुळे हमासविरोधातल्या संघर्षामध्ये इस्रायलच्या रणनितीमध्ये मोठा बदल झाल्याचे दिसते आहे. सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धामध्ये हमासला एका ठिकाणी एकवटण्यात इस्रायलला यश आले आहे.
मात्र इस्रायल आता दक्षिणेकडील अखेरचे शहर असलेल्या रफाहवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्यामुळे इस्रायलच्या सैन्याची ही माघार म्हणजे सैन्याची जमवाजमव असल्याचे इस्रायलच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
इस्रायल गेल्या काही आठवड्यांपासून रफाहवर हल्ला करण्याची तयारी करत आहे. मात्र या शहरामध्ये सध्या १.४ दशलक्ष पॅलेस्टिनींनी आश्रय घेतला आहे. त्यामुळे रफाहवरील हल्ल्याबाबत जागतिक नेत्यांकडून चिंता व्यक्त केली जाते आहे. रफाहमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाय योजना केल्या जाव्यात, अशी मागणी अमेरिकेनेही केली आहे.
मात्र इस्रायलकडून आपली रणनिती अजून उघड केली गेलेली नाही. खान युनिस शहरातील थोडे सैन्य मागे घेतले गेले असले, तरी अजूनही मोठ्या संख्येने इस्रायली सैन्य अजूनही गाझा पट्ट्यामध्ये आहे. हमासचा म्होरक्या याह्या सिनवारला पकडण्यासाठी हे सैन्य तैनात असणार आहे.
हिज्बुल्लाहचा कमांडर ठार
लेबेनानमधील हिज्बुल्लाहचा कमांडर अली अहमद हसन हा इस्रायली सैन्याच्या कारवाईमध्ये मारला गेला आहे. आणखीन दोन महत्वाचे दहशतवादी मारल्याचे इस्रायली सैन्याने म्हटले आहे. हसन हा उत्तर इस्रायलवर हल्ले करत असायचा असे इस्रायली सैन्याने म्हटले आहे. सीमाभागातील हजारो विस्थापित इस्रायलींना परत येता यावे, यासाठी लेबेनानच्या राडवान फोर्सने मागे हटावे, अशी मागणी इस्रायलकडून केली जात आहे.