नगर -आता करोनामुक्त जामखेड टिकविण्यासाठी प्रशासनाने कठोर नियमावली तयार करावी, जो नियमाचे उल्लंघन करील, तो कोणीही असला तरी प्रशासनाने कठोर कारवाई करावी, असे आदेश आमदार रोहित पवार यांनी प्रशासनाला दिले. उद्यापासून दुकाने खुली होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
दोन महिने लॉकडाऊन व एक महिन्यापासून हॉटस्पॉटचा सामना करावा लागल्याने अनेकांची गैरसोय झाली होती.आता जामखेडमधील सर्व रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे काही दुकाने सुरू करता येईल का याबाबत व्यापारी व प्रशासनाची संयुक्त बैठक आ. पवार यांनी घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, मुख्याधिकारी सुहास जगताप, आरोग्य अधिकारी डॉ. युवराज खराडे, डॉ. सुनील बोराडे, मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, रमेश आजबे, संजय कोठारी, विठ्ठल राऊत, सुर्यकांत मोरे, अमित जाधव, लक्ष्मण ढेपे यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते.
आ. पवार म्हणाले, प्रशासनाच्या सहकार्याने हॉटस्पॉट असणारे जामखेड सध्या करोनामुक्त झाले. सध्या तालुक्यात पुणे, मुंबईवरून मोठ्या प्रमाणावर चाकरमान्यांचे लोंढे येत आहेत. यामुळे योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. यासाठी काही कठोर उपाययोजना राबवाव्या लागतील. त्या प्रशासनाने राबवाव्यात यात कोणालाही सवलत देऊ नये.नगर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण जामखेड शहरात होते. त्यामुळे दोन महिने लॉकडाऊन व एक महिन्यापासून हॉटस्पॉटचा त्रास सहन करावा लागला आहे. जामखेडची बाजारपेठ गेल्या दोन महिन्यांपासून पूर्णपणे बंद होती. त्यामुळे दरम्यानच्या काळात व्यापारी, नागरिक आणि शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले.
जामखेड करोनामुक्त झाल्याने छोटे मोठे व्यवसाय सुरू करून पुन्हा काही प्रमाणात अर्थचक्र सुरळीत चालू करण्यासाठी आ. पवार यांनी पुढाकार घेऊन आज जामखेड मधील व्यावसायिक, प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली व अटी शर्तींसह उद्यापासून दुकाने सुरू करण्याचे सर्वानुमते ठरले. दुकानात पाचपेक्षा जास्त माणसे येणार नाहीत. सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे. दुकानात भावफलक असावेत, येणारा मास्क लावून व हात धुवून दुकानात प्रवेश करील व विशिष्ट वेळेतच दुकाने सुरू राहतील.