निमोणे – राज्य शासनाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून गर्भवती मातेस व गर्भात असणाऱ्या बालकास उत्तम प्रकारची शक्ती मिळावी यासाठी पोषक आहाराचे किट दिले जाते. यात बदाम, खारीक, काजू, गूळ व इतर पौष्टिक आहाराचा समावेश आहे. शासनाचे उद्दिष्ट हे मातेचे आणि बाळाचे आरोग्य तंदुरुस्त चांगले राहावे. यासाठीच हा उपक्रम आहे.
परंतु शिरुर तालुक्यातील आंबळे येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आहारातील गूळ आणि काजुमध्ये किडे आढळले आहेत. गरोदर महिलांना निकृष्ट दर्जाचा आहार दिल्याने आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
शासकीय यंत्रणेतील काही ठेकेदार प्रशासनातील ठराविक अधिकाऱ्यांना हाताशी धरुन जादा नफा मिळण्याच्या दृष्टीने निकृष्ट दर्जाचे खारीक, काजू, गूळ आदी निकृष्ट दर्जाच्या वस्तूंची खरेदी करीत असल्याचे आणि त्यातून मिळणारी जास्त मलई “मिल बाटकर खायेंगे” असाच प्रकार सुरु आहे. परंतु गरोदर मातांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.
हे किट कोणत्याही प्रकारची तपासणी न करता आणि त्यातील वस्तूंचा कसलाही दर्जा न तपासता वाटले जात आहेत. पौष्टिक आहारात जिवंत अळ्या, सोनकिडे आणि बुरशी आढळल्यामुळे हे खाद्यपदार्थ आरोग्य विभागाकडूनच दिले जाणे म्हणजे ठेकेदाराचे लाड करण्यासारखे आहे. निष्कृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांमुळे गरोदर माता व बालकाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. कमिशनच्या महाजाळ्यात असणाऱ्या ठिकाणीच हे प्रकार आढळतात, अशी नागरिकांमध्ये चर्चाही आहे.
नियमानुसार ठेकेदारावर कारवाई
बालविकास प्रकल्प अधिकारी निर्मला चोभे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, शिरुर तालुक्यातील आंबळे येथे पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने ठेकेदारामार्फत पौष्टिक आहार पुरवला आहे. तो पुन्हा जमा करुन त्याचा पंचनामा करुन त्याची चौकशी करुन जिल्हा परिषदेकडे परत पाठविण्यात येईल. ठेकेदारासोबत जिल्हा परिषदेचा जो करार झालेला आहे. त्या करारानुसार तो ‘पोषण आहार’ बदलून देण्यात येईल. नियमानुसार ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल.