अहमदाबाद – गुजरात दहशतवादविरोधी पथकाने गेल्या तीन वर्षांत त्या राज्यात सुमारे 2,170 कोटी रुपयांची मादक द्रव्ये जप्त केली आहेत. या संदर्भात अनेक पाकिस्तानी नागरिकांसह 73 जणांना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे असे एटीएसने सांगितले.
पाकिस्तानी तस्करांनी गुजरातच्या किनारपट्टीचा वापर करून अमली पदार्थांची तस्करी करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, परंतु असे सर्व प्रयत्न हाणून पाडण्यात आले असेही दहशतवाद विरोधी पथकाने म्हटले आहे. या कारवाईसाठी तटरक्षक दल आणि स्थानिक पोलिसांचीही मदत घेतली जात आहे.
गेल्या वर्षी म्हणजे सन 2021 या एकाच वर्षात गुजरात मध्ये 1466 कोटी रूपयांची मादक द्रव्ये जप्त करण्यात आली आहेत. यासाठी भारतीय पथकांनी अनेक वेळा अरबी समुद्रात जाऊनही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरातून महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) जप्त केलेल्या 21,000 कोटी रुपयांच्या मादक द्रव्यांचा या आकडेवारीत समावेश नाही. या प्रकरणाची चौकशी आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करत आहे.