कैरो : इजिप्तची राजधानी कैरोमध्ये एका चर्चला लागलेल्या भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत ४१ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर या आगीत ५५ जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहेत.
इंबाबाच्या वर्दळीच्या भागात असलेल्या अबू सेफीन चर्चला ही आग लागली असून या आगीत चर्चचे मोठे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.रविवारी सकाळच्या सुमारास इंबाबा जिल्ह्यातील अबू सेफीन चर्चमध्ये प्रार्थनेसाठी पाच हजार लोक जमले होते. त्यावेळी चर्चला भीषण आग लागली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तसेच जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांनी पोप तावाड्रोस यांच्याशी फोनवर चर्चा करून माहिती घेतली. तसेच त्यांनी फेसबुक पोस्ट करत मृतांच्या कुटुंबियांबाबत संवेदना व्यक्त केल्या. ”मी सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन आहे. सर्व यंत्रणांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. तसेच या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.”, असेही ते म्हणाले.