पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राजधानी नवी दिल्ली येथे “शिवजागर : साद सह्याद्रीची’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सहा वाजता सिरी फोर्ट ऑडिटोरियम येथे होणाऱ्या या कार्यक्रमात तब्बल २०० कलाकार छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास मांडणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने हा सोहळा आयोजित केला आहे.
विवेक व्यासपीठाने कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. कार्यक्रमात गीतगायन, नृत्य, सामूहिक नृत्य, पोवाडा व लोककला सादरीकरण, चित्रकला, रांगोळी,
शिवकालीन साहसी क्रीडाप्रकारांचे सादरीकरण अशा विविध प्रकारचे कलात्मक सादरीकरणाचा समावेश असणार आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकसंस्कृती, लोप पावत चाललेल्या अनेक लोककलांचे दर्शन “महाराष्ट्राची लोकसंस्कृती’ या भागातून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा इतिहास “शिवपर्व’ या भागातून मांडला जाणार आहे.