वाली कोण, याबाबत सामान्य शिवसैनिक संभ्रमात
प्रकाश राजेघाटगे
पुसेगाव – सातारा शिवसेनेत (उद्दव बाळासाहेब ठाकरे गट) निष्ठेचे धुमारे कमकुवत होत असून अशा कठीण परिस्थितीत आव्हानाला तोंड देण्यासाठी कोणीच पुढे येत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे सातारा शिवसेनेला (ठाकरे) वाली कोण, असा प्रश्न सामान्य शिवसैनिकांना पडला आहे. सत्ता संघर्षाच्या काळात पहिल्याच वेळी जिल्ह्यातील दोन्ही आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर घरोबा साधला. युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेद्वारे पाटणमध्ये सभा घेतली. परंतु परिस्थितीचा फायदा उठवायला जिल्ह्यातील नेते व संपर्कप्रमुख कमी पडले. त्यामुळेच आमदारांच्या घरावर पक्षाची नोटीस लावण्यासाठी गेलेले दोन्हीही जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले.
उपनेते नितीन बानुगडे- पाटील यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी असल्याचे खासगीत सांगितले जात आहे. जिल्ह्यात शिवसेना (ठाकरे) असा एकच पक्ष आहे ज्या पक्षाचे पाच-पाच कारभारी प्रमुख आहेत. पाच कारभारी असूनही पक्षाच्या दयनीय अवस्थेत कोणीही पुढे येत नसल्याचे चित्र आहे. नवीन जिल्हा संपर्कप्रमुख झालेले शेखर गोरे यांनी अजूनही जिल्हा शिवसेनेची संयुक्त बैठकही घेतलेली नाही. त्यामुळे आमदारकीची आस लागलेले शेखर गोरे माण विधानसभा सोडून जिल्हाची जबाबदारी घेण्यास फारसे इच्छुक दिसत नाहीत. येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये पक्षाची वाटचाल कशी असावी याचे साधे धोरण ठरले नसल्यामुळे शिवसैनिकांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे.
जिल्ह्यात जुने- जाणते आजी- माजी पदाधिकारी अजूनही उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य करतात. पण अशा पदाधिकाऱ्यांना जिल्हा संघटनेत अजूनही सामावून घेतले जात नाही, अशी शोकांतिका एका पदाधिकाऱ्याने बोलून दाखविली. स्वतःच्या बगलबच्चांना संधी देणाऱ्या संपर्कनेत्यांनी पक्षासाठी काय काम केले याची यादी कधीतरी मांडावी, अशी अपेक्षा शिवसैनिक व्यक्त करीत आहेत. जिल्हा शिवसेनेत कमालीची नाराजी निर्माण झाली आहे. आमदार गेले, जिल्हाप्रमुखही निघून गेले. त्यामुळे सामान्य शिवसैनिकांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील बडा नेता शिंदे गटात?
शिंदे- फडणवीस सरकार न्यायालयीन प्रक्रियेतून बाहेर पडले तर जिल्ह्यातील अजूनही काही नेते शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. यामध्ये ठाकरे गटाचे जिल्ह्यातील मुख्य संपर्क नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषदेतील पदाधिकारी सामील होणार आहेत, असे नाव न सांगण्याच्या अटीवर शिंदे गटाच्या प्रमुख नेत्याने सांगितले.
आ. महेश शिंदे मंत्रिमंडळात?
येत्या काही दिवसांत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यामध्ये कोरेगाव मतदारसंघाचे आ. महेश शिंदे यांचे नांव आश्चर्यकारकरित्या पुढे येऊ शकते असे जाणकार सांगत आहेत. कारण येणाऱ्या लोकसभेला शिंदे-फडणवीस गटाचे महेश शिंदे सर्वमान्य उमेदवार ठरू शकतात.