आंबेगाव-शिरूर मतदारसंघात दिलीप वळसे पाटलांना देणार टक्कर
मंचर- आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले यांची अधिकृत उमेदवारी शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गुरुवारी (दि. 3) जाहीर केली. तसेच बाणखेले शुक्रवारी (दि. 4) उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे आढळराव यांनी स्पष्ट केले.
शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील निवासस्थानी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीस शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुरेश भोर, जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, उपजिल्हाप्रमुख रवींद्र करंजखेले, तालुकाप्रमुख अरुण गिरे, मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे, जयश्री पलांडे, मालती थोरात, सचिन बांगर, लक्ष्मण काचाळे, प्रवीण थोरात पाटील, विजय आढारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. राजाराम बाणखेले यांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश होवून उपस्थित पदाधिकऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
शिवाजी आढळराव म्हणाले की, शिवसेनेकडे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. उमेदवारी कोणाला द्यावी, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यात इच्छुक उमेदवार आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजाराम बाणखेले यांना उमेदवारी द्यावी, असे सांगितले त्यानुसार त्यांना उमेदवारी देण्यात आली. तसेच ते शुक्रवारी (दि. 4) घोडेगाव येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरणार आहेत, असे त्यांनी नमूद करीत वळसे पाटलांवर तोफ डागली.
राजाराम बाणखेले म्हणाले की, गेल्या काही दिवसांपूर्वी मी शिवाजीराव आढळराव पाटील किंवा इतरांवर अनावधानाने टीका केली होती. त्याबद्दल मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. तसेच वळसे पाटील यांना पराभुत करण्यासाठी मला सर्वांनीसाथ द्यावी, असे आवाहन करून त्यां त्यांनी पक्षनेतृत्व आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे जाहीर आभार मानले.