Shirdi Loksabha 2024 – शिर्डी लोकसभा मतदार संघातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य रंगले आहे.
अशातच आता, महाविकास आघाडीत सामिल असलेल्या कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडूनच कॉंग्रेस नेत्या व राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांना वंचित बहूजन आघाडीकडून निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची गळ घातली जात आहे.
उत्कर्षा रुपवते यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाल्याने रुपवते नेमकी काय भूमिका घेणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.
रुपवते यांनी उमेदवारी दिल्यास अकोलेपासून नेवासा मतदार संघांतील सर्वच कार्यकर्ते जीवाचे रान करुन काम करतील, असा आत्मविश्वासही कॉंग्रेस कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. रुपवते यांच्या उमेदवारीच्या चर्चेमुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभा उमेदवार, भाऊसाहेब वाकचौरे यांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत.
अशात रुपवते निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास, एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही सरळ लढत तिरंगी होणार आहे.
रुपवतेंची भूमिका ठरणार महत्त्वाची | Shirdi Loksabha 2024
शिर्डी लोकसभा मतदारसंघ जागावाटपामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे गेल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभा उमेदवार स्थानिक पातळीवर काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना नाकारत असल्याचाही आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
महाविकास आघाडीत रंगलेली नाराजी, विरोधी उमेदवार लोखंडे यांच्या पथ्थ्यावर पडणार का? असा प्रश्न चर्चिला जातोय. तर दुसरीकडे उत्कर्षा रुपवते यांची काय भूमिका काय असणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकाच समाजाला उमेदवारी… | Shirdi Loksabha 2024
शिर्डी लोकसभा मतदार संघ हा राखीव आहे. येथून एका विशिष्ट समाजाच्या उमेदवारांना राजकिय पक्ष पसंती देत असून इतर समाजाला सर्वच राजकिय पक्षांकडून नाकारले जात असल्याने नाराजी असल्याचे देखील बोलले जात आहे.