सातारा – सातारा-कोरेगाव रस्त्यावरील संगम माहुलीनजिक रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ट्रकच्या पुढील चाकाखाली सापडून दिशा उदय घोरपडे (वय 19, मूळ रा. शिरढोण, ता. कोरेगाव, सध्या रा. सदर बझार सातारा) या तरूणीचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिशा घोरपडे शनिवारी सोनगाव, ता. सातारा येथे मामाकडे गेली होती. रविवारी सकाळी ती दुचाकीवरून (एमएच 11 बीपी 6329) सातार्याकडे यायला निघाली. संगम माहुलीजवळ आल्यानंतर ट्रकला (एमएच 46 एएफ 5447) ओव्हरटेक करून ती पुढे गेली. मात्र, तिची दुचाकी अचानक घसरल्याने ती ट्रकखाली सापडली. त्यामुळे ट्रकचे पुढील चाक तिच्या डोक्यावरून गेले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळाचे चित्र विदारक होते. या अपघाताची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस ठाण्यातील हवालदार कारळे व हवालदार धनाजी यादव हे तातडीने घटनास्थळी पोहोचले.
या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. ही वाहतूक कोंडी त्यांनी सुरळीत केली. मृत तरूणीचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या अपघाताची माहिती मृत दिशा घोरपडे हिच्या आई-वडिलांना समजल्यानंतर दोघेही जिल्हा रुग्णालयात आले. मुलीचा मृतदेह पाहून त्यांनी प्रचंड आक्रोश केला. त्यांनी केलेला आक्रोश अक्षरश: काळीज पिळवटून टाकणारा होता. दिशा ही सातार्यातील यशोदा शिक्षण संस्थेमध्ये फार्मसीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. तिचे आई-वडील शिक्षक असून, तिला एक बहीण आहे. या अपघाताची सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.