मुंबई – निर्देशांक उच्च पातळीवर असुनही परिस्थिती अधिक सकारात्मक होईल या आशेने शेअर बाजारात गुंतवणूकदार खरेदी करीत आहेत. जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश येण्याबरोबरच जागतिक गुंतवणूकही भारतीय शेअर बाजारांना आधार देत आहे. त्यामुळे आज सलग सहाव्या कामकाजाच्या दिवशी शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 14 हजार अंकाच्या समीप बंद झाला.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 133 अंकांनी वाढून 47,746 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 0.35 टक्क्यांनी म्हणजे 49 अंकांनी वाढून 13,981 या विक्रमी पातळीवर बंद झाला. बॅंका आणि औषधी क्षेत्र वगळता इतर क्षेत्राच्या निर्देशांकात वाढ झाली.
महिंद्रा अँड महिंद्रा, टेक महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर, कोटक बॅंक, एचडीएफसी बॅंक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स या कंपन्यांनी आजच्या तेजीचे नेतृत्व केले. त्याचबरोबर अल्ट्रा टेक सिमेंट आणि बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात बुधवारी मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
डिसेंबर डेरिव्हेटीव्हजच्या कॉन्ट्रॅक्टची मुदत उद्या गुरुवारी संपत असल्याने आज सकाळी भारतीय शेअर बाजारात नफेखोरी वाढल्यामुळे निर्देशांक कालच्या पातळीच्या जवळपास स्थिर राहिले. मात्र ब्रिटिश सरकारने ऍस्ट्राझेनीका कंपनीच्या करोनावरील लसीला परवानगी दिल्यानंतर युरोपातील शेअर निर्देशांकात वाढ झाली. त्यानंतर भारतीय शेअर बाजारातही तेजीचे वातावरण आले.