वॉशिंग्टन डी.सी. – पाकिस्तानमध्ये विविध धार्मिक अल्पसंख्यांक गटांविरोधात गेल्या दशकभरापासून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात व्हाईट हाऊसबाहेर शेकडो जणांनी रविवारी निदर्शने केली. विविध धर्मियांच्या प्रतिनिधींनी यावेळी पाकिस्तानमध्ये पूर्ण धार्मिक स्वातंत्र्य मिळण्याची मागणी केली. यामध्ये मोजाहिर, बलुच, गिलगीट बाल्टीस्तानी, पश्तुन आणि अन्य धार्मिक अल्पसंख्यांकांच्या प्रतिनिधींनी स्वतःच्या धार्मिक अस्मितेची जपणूक करण्यासाठी स्वतंत्र भूभागाची मागणी केली.
“मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट’ या संघटनेच्या झेंड्याखाली हे धार्मिक अल्पसंख्य एकत्र आले होते. या संघटनेचे समन्वयक रेहान इबादत यांनी यामागील भूमिका स्पष्ट केली. पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्यांकांच्याविरोधात कित्येक वर्षांपासून अन्याय केला जात आहे. अल्पसंख्यांकांच्या हत्या, अपहरण होण्याच्या घटना दररोज घडत आहेत. याकडे अमेरिकेचे लक्ष वेधण्यासाठी आणि मानवी हक्कांच्या जपणूकीसाठी ही निदर्शने करण्यात आल्याचे इबादत यांनी सांगितले.