Buldhana Bus Accident : बुलढाण्यातल्या समृद्धी महामार्गावर आजपर्यंतचा सर्वात भीषण अपघात झाला. या अपघातात बसने पेट घेतल्याने आणि डिझेलची टाकी फुटून आग पसरल्याने २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर आता राजकीय वर्तुळातून याबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याबाबत एक ट्विट करत आठवड्याभरापूर्वी केलेल्या विधानाची आठवण यावेळी करून दिली आहे.
शरद पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,”बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पिंपळखुटा भागात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटून भीषण अपघात झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात 25 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. अपघातातील जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे व्हावेत ही प्रार्थना.”
पवार पुढे म्हणतात,”या दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात. एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून होत असलेल्या अपघातांची आकडेवारी मागवून चिंता व्यक्त केली होती. अपघात रोखणाच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते” असंही पवारांनी यावेळी नमूद केलं आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पिंपळखुटा भागात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटून भीषण अपघात झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात 25 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. अपघातातील जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे व्हावेत ही प्रार्थना.…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 1, 2023
काय घडलं नेमकं यावेळी
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळील समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. यादरम्यान मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE – 1819 क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती.
बुलढाण्यातील ही दुर्घटना बसचा टायर फुटल्याने झाली नसून हा अपघात बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाल्याचा अहवाल नागपूर परिवहन विभागाने दिला आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचं बस चालकाने सांगितलं होतं मात्र बस चालकाचे नियंत्रण सुटल्यानेच हा अपघात झाला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आला आहे. अहवालातील माहितीनुसार या घटनेला वेगळं वळण मिळालं आहे. बुलढाणा येथील अपघातस्थळाची पाहाणी केल्यानंतर अमरावती आरटीओने हा प्राथमिक अहवाल सादर केला आहे.