- ऑक्टोबर महिन्यात पक्षाचा मेळावा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचार आणि आगामी महापालिका निवडणुकीची व्यूहरचना ठरविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. सत्ताधाऱ्यांकडून विविध विकासकामांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारावर बराच वेळ चर्चा करण्यात आली. त्यानंतर आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची भूमिका ठरविण्यासाठी 13 ऑक्टोबर रोजी शहरातील माजी नगरसेवकांची पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचा निर्णय झाला आहे. तसेच 16 ऑक्टोबर रोजी पक्षाचा मेळावा घेण्याचे निश्चित झाले असल्याची माहिती माजी आमदार विलास लांडे यांनी दिली.
शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शहरात यावे ही मागणी करण्यासाठी नगरसेवकांच्या शिष्ठमंडळाने पवार यांची भेट घेतली. त्यानुसार, मागणीचा विचार करून 13 ऑक्टोबर रोजी पिंपरी-चिंचवड शहरात येऊन माजी नगरसेवकांची बैठक घेण्यास शरद पवार यांनी अनुमती दर्शविली आहे. तसेच, आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिशा देण्यासाठी पक्षाचा मेळावा घेण्यासही त्यांनी संमती दिली असल्याचे माजी आमदार लांडे यांनी सांगितले.
लांडे यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि स्मार्ट सिटी योजनेद्वारे शहरात भ्रष्टाचाराचा सुकाळ झाला आहे. प्रत्येक विकासकामांच्या निविदेत जवळच्या व्यक्तीला किंवा नातेवाइकाला सहभागी करून सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी चुकीची कामे करत आहेत. विविध कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे. हा भ्रष्टाचार रोखून यात सहभागी असणाऱ्या अधिकारी व सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे निवेदने देऊन वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.