पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त सोनिगरा मैदान, रुपीनगर तळवडे येथील नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी नेत्र चिकित्सा आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. त्यास नागरिकांनी उदंड प्रतिसाद लाभला.
राज्यात दररोज साधारणतः पाच हजार रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते. करोनामुळे नियमित चालणाऱ्या रक्तदान शिबिराना मोठा फटका बसला. परिणामी राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला. ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक प्रविण भालेकर यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. शिबिरासाठी नागरिकांचा व विशेषतः तरूणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. त्यामुळे 160 युनिट रक्तसंकलित झाले. पिंपरी चिंचवड ब्लड बॅंकेचे मकरंद शहापूरकर व डॉक्टरांच्या पथकाकडून आवश्यक तपासण्या केल्या. तसेच नेत्र चिकित्सा शिबिरामध्ये 150 महिलांना तपासणी केली. नगरसेवक प्रवीण भालेकर यांच्या माध्यमातून मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
या महारक्तदान शिबिरास खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक अजित गव्हाणे, पंकज भालेकर, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे आदी मान्यवरांनी भेट दिली.
यावेळी बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले, शरद पवार यांचा या वर्षीचा वाढदिवस म्हणजे आठ दशके कृतज्ञतेची, त्यामुळे विविध सामाजिक उपक्रम्र आयोजित करण्यात आले आहेत. प्रवीण भालेकर यांनी महारक्तदान शिबिर व मोफत चष्मे वाटप उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
कार्यक्रम यशस्वितेसाठी नगरसेवक प्रवीण भालेकर युवा मंच व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले.