पुणे – सध्या करोनाविषाणूमुळे सर्वत्र कोविड-19 साथ पसरलेली असताना, सार्वजनिक स्वच्छतेचे सर्व नियम अजूनही अनेक जण धाब्यावर बसवताना दिसत आहेत. वाहन चालवताना रस्त्यात थुंकणे, मास्क न वापरणे अथवा सार्वजनिक ठिकाणी नाक शिंकरण्यासारखे प्रकार बेजबाबदार नागरिक करताना दिसून येत आहेत. सोमवारी संध्याकाळी अशाच एका टेम्पोचालकाला एका जागरुक महिलेने धडा शिकवला.
सदर महिला आपले कार्यालयीन कामकाज संपवून तिच्या दुचाकीवरुन वारजे उड्डाणपूलावरुन घरी निघाली होती. त्यावेळी पुढे असलेल्या मालवाहतूकदार टेम्पोचालक (टेम्पो क्र. एम एच 12 -एमव्ही -0545 ) वाहनातून डोके बाहेर काढून रस्त्यावर थुंकला. सदर महिलेच्या अंगावर घाण उडल्याने, तिने या टेम्पोचालकाचा पाठलाग केला आणि त्याला वांजळे उड्डाण पूल सिग्नल येथे पोलिसांच्या ताब्यात दिले. वाहतूक पोलिसांनी सदर टेम्पोचालकाविरोधात त्वरेने कारवाई केली. या टेम्पोचालकाकडे वाहनाची आणि वाहन चालवण्याची योग्य कागदपत्रेही नसल्याचे स्पष्ट झाले.
नागरिकांनी अशा प्रकारे नियम मोडणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांविरोधात तक्रारी करणे गरजेचे असल्याचे या घटनेतून सिद्ध झाले आहे. तरच अशा साथीच्या रोगांना थोडाबहुत का होईना आळा बसेल, असे मानले जात आहे.