सातारा -येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये सोमवारी दि. 27 रोजी सकाळी 11 वाजता लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे उदघाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.
संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य रामशेठ ठाकूर छत्रपती शिवाजी कॉलेजचे माजी विद्यार्थी असून त्यांनी “कमवा आणि शिका’ योजनेतून पदवीपर्यंतचे शिक्षण या महाविद्यालयात घेतले. पुढच्या काळात उद्योजक म्हणून प्रवास करीत ते रायगड जिल्ह्याचे खासदार झाले होते. संस्थेला त्यांनी मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या आहेत.
वर्गखोल्यांची अडचण पाहून आठ कोटीपर्यंतचा खर्चाची तळमजल्यासहित पाच मजली इमारत त्यांनी स्वखर्चाने बांधून दिली आहे. या इमारतीस लोकनेते रामशेठ ठाकूर भवन असे नाव संस्थेने दिले आहे.
या इमारतीशिवाय छत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्रशासकीय इमारतीच्या नूतनीकरणासाठी रामशेठ ठाकूर यांनी एक कोटीची रक्कम दिली आहे. या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उदघाटनदेखील शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.
संस्थेचे मानद सचिव इस्माईलसाहेब मुल्ला यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या नावाने दरवर्षी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार या वर्षी राज्याचे गृहमंत्री व संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य दिलीप वळसे पाटील यांना पवार यांच्या हस्ते मानपत्र देऊन प्रदान करण्यात येणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.अनिल पाटील आहेत.