डान्सबारवर छापा घालून 10 पुरुषांसह सात महिला ताब्यात

नगर-पुणे महामार्गावरील हॉटेलवर पोलिसांची कारवाई ः मालक पळून जाण्यात यशस्वी

सुपा  – नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्‍यातील जातेगाव परिसरात हॉटेल जयराजवरमध्ये सुरू असलेल्या डान्सबारवर सुपा पोलिसांनी झापा घातला. यावेळी 10 पुरुषांसह सात महिलांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस आल्याचे समजताच हॉटेल मालक पळून जाण्यात यशस्वी झाले. ही कारवाई मंगळवारी (दि.20) रात्री नऊ वाजता करण्यात आली. याप्रकरणी आज पहाटे साडेचार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सुपा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांना सुपा परिसरातील हॉटेल जयराजमध्ये अवैध डान्सबार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सुपा पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर सुपा पोलिसांनी हॉटेल जयराजवर छापा घातला. यावेळी हॉटेलच्या मजल्यावरील पार्टी हॉलमध्ये सात बारबाला नाचत असल्याचे व उपस्थित पुरुष त्यांच्यावर पैसे उधळत गैरवर्तन करत असल्याचे आढळले.

यावेळी सात महिलांसह संजय विठ्ठलराव जाधव (रा. गंगापूर), प्रशांत अण्णासाहेब पाटील (रा. गंगापूर), अजित गुंडोपंत कदम (रा. लोहगाव), कृष्णा सूर्याजी तोबरे (रा. लातूर), संदीप देविदास साबणे (रा. गंगापूर), सय्यद नासिर सय्यद इस्माईल, अमोल सुभाषराव वरकड (दोघे रा. गंगापूर), सारंगधर शंकरराव जाधव (रा. कासोडा), प्रदीप सत्यनारायण नवंदर, वाल्मीक विठ्ठलराव शिरसाठ (सर्व रा. गंगापूर) यांना अटक करण्यात आली. यावेळी हॉटेल चालक नितीन शेट्टी, राजेंद्र सातव हे पळून जाण्यात यशस्वी झाले. पो. कॉ. यशवंत भानुदास ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुपा पोलीस ठाण्यातील कर्मचारी करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.