राजनंदगाव – छत्तीसगडच्या राजनंदगावमध्ये आज सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश आहे आहे. जिल्हा राखीव गार्डच्या दलाबरोबर आज झालेल्या चकमकीत हे सात नक्षलवादी ठार झाले आहेत.
राजनांदगाव जिल्ह्यातील बागनदी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र सीमेवरील शेरपाल आणि सीटगोटाच्या डोंगरावर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. जिल्हा पोलीस, डीआरजी आणि सीआरपीएफची संयुक्त कारवाई करण्यात आली. यावेळी नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला जवानांनी चोख उत्तर दिले.
यामध्ये सात माओवाद्यांना कंठस्नान घातले गेले. चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षल्यांमध्ये 4 पुरुष, तर 3 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या कारवाईनंतर मोठ्या प्रमाणात शत्रसाठा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती छत्तीसगडचे पोलीस महासंचालक डी. एम. अवस्थी यांनी दिली. दुसरीकडे जगदलपूर येथे आज दोन नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ कॅम्पमध्ये आत्मसर्मपण केले. या नक्षलवाद्यांना सरकारकडून रोख 10 हजार रुपये आणि मुलभूत गरजांसाठीची सामुग्री देण्यात आली.
दरम्यान, नक्षल्यांनी पुकारलेल्या संपूर्ण दंडकारण्य बंदचा आज शेवटचा दिवस होता. या दिवशी ही मोठी कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरुन एक-47, 303 रायफल, 12 बोर बंदुका, सिंगल शॉट रायफल आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून अजूनही कोम्बिंग ऑपरेशन सुरु असल्याची माहिती देण्यात आली.