ब्यूनस आयर्स – अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने गेल्या वर्षी कतार येथे खेळल्या गेलेल्या फिफा विश्वकरंडकादरम्यान परिधान केलेल्या १० क्रमांकांच्या सहा जर्सींचा लिलाव करण्यात आला आहे. या सर्व जर्सी लिलावात ७८ लाख डॉलर्समध्ये विकल्या गेल्या आहेत. लिलाव करणारी संस्था सोथबीजने याबाबतची घोषणा केली आहे.
२०२२ मध्ये कतार येथे खेळल्या गेलेल्या फिफा विश्वकरंडक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यांमध्ये मेस्सीने हे शर्ट परिधान केले होते, असे सोथबीजने सांगितले आहे. यंदा खेळाशी संबंधित वस्तूंच्या लिलावात या जर्सिंना सर्वाधिक किंमत मिळालेली आहे. जर ७८ लाख डॉलर भारतीय रुपयात रूपांतरित केले तर ते अंदाजे ६४ कोटी ७७ लाख रुपये इतके होतात. म्हणजेच त्याच्या एका जर्सीला अंदाजे १०.५ कोटी रुपये इतकी किंमत मिळाली आहे.
अर्जेंटिनाने विश्वकरंडक अंतिम फेरीत फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करून तिसरे विश्वविजेतेपद पटकावले होते. अंतिम सामन्यात दोन्ही संघ निर्धारित वेळेपर्यंत ३-३ असे बरोबरीत होते, त्यानंतर पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. यास्पर्धेत मेस्सीने एकूण सात गोल केले होते ज्यामुळे त्याला गोल्डन बॉल पुरस्कारही मिळाला होता. अशाप्रकारे हा पुरस्कार दोनदा जिंकणारा तो पहिलाच फुटबॉलपटू ठरला होता.
मेस्सी शर्ट्ससाठी विजेती बोली लावणाऱ्यांबद्दल अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. अलीकडेच, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार एम.एस. धोनीची विश्वकरंडक २०११ च्या फायनलसाठीची बॅटही चर्चेत होती. त्याची बॅट २०११ मध्येच लाखो रुपयांना खरेदी करण्यात आली होती. आज तिची किंमत करोडो रुपये झाली आहे.
FIFA Women’s Rankings : विश्वचषक विजेता स्पेन फिफा क्रमवारीत अव्वल तर भारतीय संघ ‘या’ स्थानावर..
तिसरी सर्वांत महाग जर्सी
मेस्सीची जर्सी लिलावात विकली गेलेली कुठल्याही खेळाडूची तिसरी सर्वांत महाग जर्सी ठरली आहे. यापूर्वी मायकेल जॉर्डन यांच्या १९९८ च्या एनबीए फायनलच्या जर्सीला २०२२मध्ये लिलावात तब्बल १०.१ दशलक्ष डॉलर्स(८३ कोटी ८७ लाख) इतकी विक्रमी किंमत मिळाली होती. त्यानंतर डिएगो मॅराडोनाने १९८६च्या विश्वकरंडकात परिधान केलेली कल्पित हँड ऑफ गॉड गोल जर्सी मे २०२२ मध्ये ९.२८ दशलक्ष डॉलर्सला(७७ कोटी ७ लाख) विकली गेली होती.