पिंपरी, दि. 10 (प्रतिनिधी) – नवी सांगवीतील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील समस्यांकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे. रुग्णालय परिसरातच कचरा जाळला जात आहे. तसेच विविध विभागात घाणीचे साम्राज्य पसरले असून त्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही. परिणामी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचेच आरोग्य धोक्यात असल्याचे चित्र आहे.
नवी सांगवीतील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पुणे जिल्ह्यासह राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. रुग्णालयातून त्यांना योग्य सुविधा देणे गरजेचे असताना त्याबाबत उदासिनता दिसत आहे. रुग्णालयातील आवारात कचरा उचलण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. तसेच जमलेल्या कचऱ्याची इतरत्र विल्हेवाट न लावता रुग्णालय परिसरातच तो जाळला जात आहे. त्यामध्ये जैव वैद्यकीय कचरा देखील असल्याचे निदर्शनास येत आहे.
याबरोबरच रुग्णालयातील विविध वॉर्डमध्ये अस्वच्छता पसरल्याचे दिसते. अनेक ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर माती, राडारोडा पडल्याचे चित्र होते. त्याची स्वच्छता न झाल्याने ये-जा करणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना त्रास सहन करावा लागत होता. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. या बाबत वरिष्ठांशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.
प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक नाही –
जिल्हा रुग्णालयात आत प्रवेश करताना त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकच नाहीत. सुरक्षा रक्षकांसाठी बनविलेले केबिन देखील तुटलेल्या अवस्थेत आहे. रुग्णालयात कोण येणार, या बाबत चौकशी केली जात नाही. त्यामुळे रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मद्यपींचा अड्डा
रुग्णालय परिसर मद्यपींचा अड्डा बनला आहे. रुग्णालयातील गार्डनमध्ये दारुच्या बाटल्यांचा खच पडत आहे. त्यांना आळा घालण्यात रुग्णालयीन प्रशासनाला अपयश येत असल्याचे दिसते. सुरक्षारक्षकांची नेमणूक करून या बाबत कारवाई करण्याची मागणी रुग्णांचे नातेवाईक करत आहेत.