पिंपरी -औषध निर्मितीसाठी चीनमधून येणाऱ्या कच्च्या मालाचे दर वाढल्याने आता मेडिकलमधील औषधे महागल्याने आधीच महागाईच्या फेऱ्यात अडकलेल्या नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागली आहे.
हृदयरोग, मधुमेह, ऍन्टासिड व पॅरासिटामॉल औषधांच्या किमती 15 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. तर दुसरीकडे टॉनिक व ऍन्टीबायोटिक्स औषधांबरोबरच खोकल्याची औषधेही महागली आहेत. याचा सर्वाधिक फटका रोज औषधे घ्यावीच लागणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे.
रक्तदाबाच्या दहा गोळ्यांची एक स्ट्रिप : आधीची किंमत 172 रूपये आताची किंमत 190 रुपये. डायबेटीज गोळ्यांची एक स्ट्रीप आधी 11 रुपये 30 पैसे होती आता 18 रुपये 50 पैसे इतकी महागली. अँटासिडच्या 15 गोळ्यांची किंमत पूर्वी 24 रुपये होती ती आता 37 रुपये झालीडेटॉलची 105 रुपयांची बाटली आता 116 रुपये झाली आहे. कॅल्शियम गोळ्यांच्या किंमत 99 रुपयांवरुन 110 रुपयांवर गेली आहे. झंडू बामच्या एका बाटलीची किंमत 35 रुपये होती आता ही किंमत 40 रुपये पेक्षा अधिक आहे.
पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीमध्ये औषध निर्मितीचे अनेक प्रकल्प आहेत. करोनामुळे औषधे बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि रसायनांच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे कारण देत औषधे महागल्याचे म्हटले जात आहे. मध्यमवयीन व ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असलेल्या औषधांचा यात समावेश आहे. खासगी आस्थापनांमधून सेवानिवृत्त झालेल्या पेन्शनर्सना दीड ते दोन हजार रुपये सेवानिवृत्ती वेतन मिळते.
या तुटपुंज्या रकमेतून हे नागरिक स्वत:चा वैद्यकीय खर्च भागवत असल्याने कुटुंबीयांवर आर्थिक भार पडत नसायचा. मात्र आता ही औषधे महागल्याने महिनाभराचा वैद्यकीय खर्च कसा भागवायचा? असा प्रश्न ज्येष्ठांना पडला आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट आहे, त्यांच्यासाठी ही थोडी वाटणारी भाववाढ खूप अधिक आहे.
जेनेरिक औषधांच्या पर्यायाकडे दुर्लक्ष
अनेकदा डॉक्टरांकडून रुग्णांना महागडी औषधे लिहून दिली जातात. मात्र, या औषधांमधील “कन्टेंट’ एकसारखी असलेली अनेक जेनेरिक औषधे मेडीकलमध्ये उपलब्ध असतात. मात्र. रुग्णांकडून जेनेरिक औषधे नाकारली जात असल्याने महागड्या औषधांचा आर्थिक भार सहन करावा लागत आहे.