लंडन – फिफा फुटबॉल विश्वकरंडक पात्रता स्पर्धेतील इजीप्त व सेनेगल यांच्यातील सामन्यादरम्यान खेळाला काळिमा फासली गेल्याची घटना घडली. इजीप्तचा स्टार खेळाडू महंमद सलाह व गोलकीपर महंमद अल्नेशा यांच्या डोळ्यांवर सेनेगलच्या पाठीराख्यांनी तब्बल 3 हजार वेळा लेझरबीमचा मारा केला.
हा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये सेनेगलने 3-1 असा जिंकला व विश्वकरंडक स्पर्धेची पात्रता मिळवली. या सामन्यात पूर्ण वेळेत 1-1 अशी बरोबरी झाली होती. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटद्वारे सामना निकाली काढण्यात आला.
यावेळी सेनेगलच्या चाहत्यांनी अखिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले. सलाह व अल्नेश यांच्यासह अन्य काही खेळाडूंच्या डोळ्यांवरही लेझर बीम (लेझर प्रकाशझोत) मारले. सलाहने तरीही गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याची पेनाल्टी हुकली व त्यांना पराभव पत्करावा लागला.
सामन्याचे समालोचक व प्रशिक्षक यांच्यासह काही प्रेक्षकांनीही सेनेगलच्या चाहत्यांच्या कृतीवर संताप व्यक्त केला आहे.