पुणे – सौंदर्य प्रसाधनांचे विनापरवाना उत्पादन केल्याप्रकरणी एका कंपनीवर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली. कोंढवा आणि नऱ्हे येथील फ्लॅटवर छापा टाकून 10 लाख 55 हजार 208 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
कोंढवा येथील मे. यु. आर. दुग्गड प्रा. लि. आणि नऱ्हे येथील मे. ए. मेरा इंडिया या दोन ठिकाणांहून हा माल जप्त केला. अन्न आणि औषध प्रशासनाच्या पुणे कार्यालयातील औषध निरीक्षक अतीश सरकाळे, ए. के ठाकरे आणि जयश्री सवदत्ती यांनी कोंढवा येथील शांतीनगर सोसायटीमध्ये असलेल्या मे. यु. आर. दुग्गड प्रा. लि. यांच्या फ्लॅटवर छापा टाकला. तेथे मॅजिक सोप या सौंदर्य प्रसाधनांचा विनापरवाना उत्पादन केल्याचे आढळून आले.
या सोपचा नमुना प्रयोगशाळा चाचणीसाठी घेण्यात आला. उर्वरीत सामुग्री, कच्चा माल, उपकरणे, प्रिंटेड लेबल्स, कार्टन अणि डिलिवरी चलन आदी मुद्देमाल जप्त केला. तसेच या संस्थेने त्यांच्या सौंदर्य प्रसाधनांची विक्री नऱ्हे येथील मे. ए. मेरा इंडिया, स्वस्तिक ऍग्रो येथे विकल्याचे समजले. प्रशासनाने तेथे छापा टाकून हॅंडमेड केक सोप, हेअर ऑइल, बॉडी लोशन, बॉडी सॉल्ट आदी जप्त केले.
या सौंदर्य प्रसाधनाच्या लेबलवर कोणताही उत्पादन परवाना क्रमांक नमूद नसल्याचे दिसून आले. त्यावर फक्त मॅन्यु. बाय युआर दुग्गड प्रा. लि. कोंढवा, तर काही उत्पादनांवर पीआयके ऑर्गनिक भिवंडी, ठाणे, असे नमूद केल्याचे दिसून आले. त्याचेही सॅंपल प्रयोगशाळा तपासणीसाठी ताब्यात घेतले.