मुंबई – शेअर बाजाराचे निर्देशांक जास्त पातळीवर असल्यामुळे परदेशी गुंतवणूकदाराबरोबरच स्थानिक गुंतवणूकदार विक्री करीत आहेत. त्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक गुरुवारी पुन्हा एक टक्क्याने कोसळले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 741 अंकांनी म्हणजे 1 टक्क्याने कोसळून 70,319 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 101 अंकांनी कोसळून 21,352 अंकावर बंद झाला.
आज माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात विक्री झाली असल्याचे दिसून आले. टेक महिंद्रा कंपनीच्या शेअरचा भाव सहा टक्क्यांनी कोसळला. या कंपनीने काल ताळेबंद जाहीर केला होता. या ताळेबंदात कंपनीचा नफा 60 टक्क्यांनी कमी होऊन 510 कोटी रुपये झाला आहे. एअरटेल, आयटीसी, एचसीएल टेक्नॉलॉजी, एशियन पेंट्स, विप्रो, एचडीएफसी बँक, नेस्ले, टाटा स्टील या कंपन्याच्या शेअरच्या भावात घट झाली. मारुती कंपनीच्या शेअरचा भावही आज कमी झाला.
जेएसडब्ल्यू स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली. दक्षिण कोरिया, जपान, शांघाय, हाँगकाँग येथील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते तर अमेरिका आणि युरोपातील शेअर बाजार निर्देशांक कमी झाले होते.
परदेसी संस्थागत गुंतवणूकदाराकडून भारतीय शेअर बाजारात विक्री चालू असून काल या गुंतवणूकदारांनी 6,934 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. किमान एक आठवडा हे गुंतवणूदार विक्री करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तीन दिवसाच्या विक्रीनंतर काल शेअर बाजरात बरीच खरेदी झाली होती. मात्र आज पुन्हा शेअर बाजारात विक्रीचा जोर वाढला.