नगर – शहरातील नामंकित खासगी हॉस्पिटलमधील सुरक्षारक्षकाचे अपहरण करून त्याला महापालिकेत नेऊन मारहाण केल्याप्रकरणी भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे याच्यासह तिघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरक्षारक्षक संजय परशुराम छत्तीसे (वय-42 रा. रुईछत्तीसी, ता. नगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
स्वप्नील शिंदे, भैया संपत गोरे यांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, साईदीप हॉस्पिटल येथे सहाव्या मजल्यावर काम करीत असताना 13 मे रोजी दुपारी तीन वाजता तीन अनोळखी व्यक्ती लिफ्टने त्यांच्याजवळ आले. यावेळी छत्तीसे यांच्या नावाची विचारणा करून तू आमच्या बरोबर चल. नगरसेवक स्वप्नील शिंदे यांनी बोलविले आहे, असे त्यांना सांगितले. त्यावर छत्तीसे यांनी त्यांना मी येणार नाही, मला काम आहे, असे सांगितले. यावेळी त्या तिघांनी छत्तीसे यांना बळजबरीने एका वाहनातून महानगरपालिका येथे आणले. तसेच महापालिकेती पहिल्या मजल्यावरील स्वप्नील शिंदे यांच्या दालनामध्ये नेले.
शिंदे व इतरांनी फिर्यादीला मारहाण केली. भैया संपत गोरे याची पाईपलाईन शेतातून जाऊ दे, त्यास विरोध करू नको. जर विरोध केला, तर तुझे हात-पाय काढून घरी बसवू, असा त्याला दम दिला. ऑफिसमध्ये बाजूला बसलेल्या लोकांना पहाता काय रे, याचे तंगडे तोडा, असा दम दिला. तसेच मला मारण्यासाठी चिथावणी दिली. त्यानंतर मला पुन्हा खासगी रुग्णालयात सोडण्यात आले, असे फिर्यादित म्हटले आहे.