- चार वर्षांत एकही मानाचे पद नाही – आगामी निवडणुकीत परिणाम दिसण्याची शक्यता
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये तीन विधानसभा मतदारसंघ आहेत,त्यापैकी महापालिकेमध्ये भोसरी आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघातीलच नगरसेवकांचा वरचष्मा आहे. तर पिंपरी विधानासभेतील नगरसेवकांच्या वाट्याला नेहमीच दुय्यम स्थान देण्यात आले आहे. निवडणुकीनंतर चार वर्षांमध्ये पिंपरीतील एकाही नगरसेवकाला मानाचे पद देण्यात आले नाही. त्याचे परिणाम आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये 2017 मध्ये भाजपने एकहाती सत्ता खेचून आणली. पारदर्शक कारभार आणि सर्वांना समान न्यायाचे आश्वासन देत भाजपच्या नेत्यांनी निवडणुकीत बाजी मारली. सत्ता आल्यानंतर महापालिकेमध्ये महत्त्वाच्या पदावर विराजमान होण्याची स्वप्नं पाहत उमेदवारांनी मतांचा जोगवा आपल्या पदरात पाडून घेतला. मात्र, सत्तेच्या केंद्रस्थानी विराजमान झाल्यानंतर अनेक नगरसेवकांना पदापासून वंचित ठेवण्यात आले. त्यामध्ये पिंपरी विधानसभेतील एकाही नगरसेवकाला मानाचे पद मिळाले नसल्याने नाराजी वाढली आहे.
स्थायी, शिक्षण, विधी यासारख्या महत्त्वाच्या समित्यांच्या सभापतीपदी भोसरी व चिंचवडचीच वर्णी लागलेली आहे. तर महापौर या मानाच्या पदावर देखील याच मतदारसंघातील नगरसेवकांना स्थान मिळाले आहे.
पिंपरीतील नगरसेवकांना केवळ उपमहापौर पदावरच समाधान मानावे लागले आहे. सुरुवातीला शैलजा मोरे (प्राधिकरण, वॉर्ड नंबर 15) यांना उपमहापौर पद देण्यात आले. त्यानंतर चिंचवडमधील सचिन चिंचवडे (पवनानगर, वॉर्ड नं. 17) यांना संधी देण्यात आली. तर पुन्हा पिंपरी विधानसभेतील तुषार हिंगे व केशव घोळवे यांना उपमहापौर पद देण्यात आले. मात्र पक्षाने दोघांचाही तडकाफडकी राजीनामा घेतला आणि अवघ्या काही महिन्यांतच त्यांना पदावरून दूर केले.
स्थायी समिती सभापती, महापौर व पक्षनेते या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पदावर भोसरी आणि चिंचवडमधीलच नगरसेवकांची वर्णी लागली आहे. तर चार वर्षांमध्ये एकही मानाचे पद न दिल्याने पिंपरीतील नगरसेवकांमध्ये नाराजी आहे.
दोन्ही उपमहापौरांचे तडकाफडकी राजीनामे
पिंपरी विधानसभा मतदारसंघातून तुषार हिंगे व केशव घोळवे हे उपमहापौर झाले. त्यामध्ये तुषार हिंगे यांना पक्षाने अचानक राजीनामा द्यायला सांगितला. त्यावेळी पिंपरी मतदारसंघातील एकाही नगरसेवकाला मानाचे पद का नाही असा प्रश्न तेथील नगरसेवक व शहरातील मुंढे गटाने पक्षश्रेष्ठींना विचारला. मानाचे पद मिळावे यासाठी मुंढे गटाने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे गाऱ्हाणे घालत उपमहापौर पद घोळवे यांना मिळवून दिले. मात्र सर्वांना पद द्यायचे असल्याने केवळ पाचच महिने तुम्हाला पद देण्यात येईल, या अटीवर घोळवे यांच्या गळ्यात उपमहापौर पदाची माळ घातली. मात्र पाच महिने पूर्ण व्हायच्या आतमध्येच त्यांना पक्षाने राजीनामा द्यायला लावला.
आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये परिणाम
फेब्रुवारी 2022 मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे. या निवडणुकीसाठी अवघे अकरा महिने शिल्लक आहेत. चार वर्षांच्या काळामध्ये चिंचवड आणि भोसरी येथील नगरसेवकांनाच मानाच्या पदावर वरिष्ठ नेत्यांनी बसविले आहे. मानाच्या समजल्या जाणाऱ्या महापौर, स्थायी सभापती व पक्षनेते या पदांवर भोसरी व चिंचवडच्याच सदस्यांची वर्णी लागली आहे. तर पिंपरीतील नगरसेवकांना जाणूनबुजून डावले असल्याची खदखद येथील नगरसेवकांमध्ये आहे. त्याचा परिणाम आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सक्षम नेतृत्वाचा अभाव
पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले आहेत. यामुळे भाजपच्या नगरसेवकांची बाजू मांडण्यासाठी सक्षम नेतृत्व नाही. शहरातील भाजपचे दोन आमदार हे आपल्या मतदारसंघातील सदस्यांना अधिकाधिक न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यामुळे पिंपरीतील नगरसेवकांना दुय्यम स्थान मिळाले आहे.