अबाऊट टर्न : कॉपी-कॅट्‌स

-हिमांशू

आपल्या हातात स्मार्टफोन आहे म्हणून आपण स्वतःला दिव्यदृष्टी लाभली आहे, असं समजू लागलो आहोत. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे काय चाललंय हे स्मार्टफोनच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय. आपल्यातले काहीजण स्वतःला “व्यास’ समजू लागलेत; कारण मित्राला पाठवण्याचा संदेश ते तोंडी सांगतात आणि श्रीगणेश बनून स्मार्टफोन तो संदेश लिहायचं काम करतो. 

स्मार्टफोन कधी आपला सारथी बनतो तर कधी रिमोट कंट्रोल तर कधी वाटाड्या. आता कुणाचा पत्ता विचारण्यासाठीही तोंड उघडायला लागत नाही! चॅट करणाऱ्यांना मित्रमैत्रिणींची भेट झाली नाही तरी चालतं. मोबाइलवर गेम खेळणाऱ्या पोरांना मित्रमैत्रिणी नसल्या तरी चालतं. (एवढं करून लॉकडाऊनमध्ये मात्र कुणी भेटत नाही म्हणून घुसमटल्यासारखं होतं.) पुराणातल्या ज्या कथा आपल्याला “चमत्कार’ वाटायच्या त्या आता आपण “जगू’ लागलो आहोत आणि त्यामुळेच मोबाइल हा आपला अवयव बनला आहे.

मोबाइलवरून जेवणखाण मागवणाऱ्यांना “अन्नपूर्णा’ प्रसन्न असल्याचा भास होतो आणि डिलिव्हरी बॉय दारात येऊन उभा राहिला, की आपणच देव असून आपल्याला नैवेद्य दाखवला जातोय, असं वाटतं. पेमेन्ट ऍपवर एखादं मोठ्ठं बिल मिळाले की संबंधिताला “कुबेर’ प्रसन्न झाल्यासारखं वाटत असेल. परंतु पुराणातलंच उदाहरण द्यायचं झालं तर दुसऱ्या बाजूला आपण “नारद’सुद्धा झालो आहोत आणि आपली परीक्षा पाहणारे सायबर दुनियेत वळणावळणावर टपून बसले आहेत.

नारदमुनींची परीक्षा पाहण्यासाठी विष्णूदेवांनी त्यांच्या हाती तेलानं काठोकाठ भरलेलं भांडं दिलं होतं. भांडं थोडं जरी तिरकं झालं तरी तेल सांडेल अशी परिस्थिती! याच स्थितीत त्यांनी नारदमुनींना त्रिभुवनसंचार करून यायला सांगितलं. अट एकच होती… तेलाचा एकही थेंब सांडता कामा नये. अशी व्यवधानं सांभाळताना नामस्मरण करणं लक्षात राहत नाही, हे नारदमुनींना त्या दिवशी समजलं होतं. आज आपण असंख्य सेलफोनधारक अशी अनेक नावं विसरून गेलो आहोत आणि आपल्या हाती सेलफोन आहे म्हणजे तेलानं गच्च भरलेलं भांडं आहे.

कोण, कुठून, कधी आपल्या दुनियेत डोकावेल याचा नेम नाही. आपली कोणती गोष्ट कुणाला ठाऊक असेल, हे आपल्याला ठाऊक नसतं. गंमत म्हणजे, अशी “टेहळणी’ करणाऱ्यांची “नियुक्‍ती’ आपणच केलेली असते. एके दिवशी बातमी येते, “अमुक-तमुक ऍप धोकादायक आहे. गूगल प्ले-स्टोअरमधून ते डिलीट करण्यात आलं आहे आणि तुम्हीही ते तातडीनं डिलीट करा…’ आतापर्यंत आपली माहिती चोरली गेली असेल का? असेल तर कोणती? किती? असे असंख्य प्रश्‍न एकाच क्षणात पडतात आणि झोप उडते. विशिष्ट ऍप टेहळणीसाठी वापरलं जातंय, हे बऱ्याच दिवसांनी समजतं, हे सगळ्यात वाईट!

गूगल प्ले-स्टोअरवरून नुकतीच तब्बल 164 ऍप्स हटवण्यात आलीत. अशा ऍप्सना “कॉपी कॅट्‌स ऍप’ म्हणतात, हे अनेकांना उशिरा समजलं असेल. कारण डिलीट केलेली ही ऍप्स आतापर्यंत सुमारे 10 कोटी वेळा डाउनलोड केली गेलीत. फोनमधल्या माहितीची कॉपी करून नको त्यांच्या हाती देणारी ही ऍप्स आहेत. 164 ऍप्स डिलीट केली असली तरी ही मालिका थांबणार नाहीये. नवनवीन ऍप्स येतील, सुरक्षेची हमी देतील आणि बेमालूमपणे माहिती चोरतील. सेलफोनधारका, सावध राहा!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.