61 वर्षापूर्वीं प्रभात : दुहेरी नागरिकत्वाचा उपभोग घेणारे चिनी

ता. 08, माहे मार्च, सन 1960

सरकार साखरेची आयात मुळीच करणार नाही

नवी दिल्ली, ता. 7 – सरकार साखरेची आयात करणार नाही असे स्पष्ट निवेदन अन्नखात्याचे मंत्री
स. का. पाटील यांनी आज लोकसभेत केले. ते म्हणाले, “आपल्याला आवश्‍यक ती साखर निर्माण करण्याची ताकद या देशात आहे.’ श्री. सी. पाणिग्रही आणि पी. के. देव यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देताना
स. का. पाटील म्हणाले की, नवे साखर कारखाने काढण्याच्या कित्येक योजनांचा तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत समावेश केला जाईल. चालू वर्षी 20 लाख टन साखर उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे.

दुहेरी नागरिकत्वाचा उपभोग घेणारे चिनी

नवी दिल्ली- भारतातील चिनी नागरिकत्वाच्या चीन व भारत या दोनही देशाच्या नागरिकत्वाबाबत राज्य सभेत प्रश्‍नोत्तरे झाली. पंत म्हणाले की, दोनही ठिकाणी नागरिकत्वाचे हक्‍क उपभोगीत असलेले असे काही शेकडो नागरिक असतील.

अल्प बचतयोजनेच्या सक्‍तीमुळे प्राथमिक शिक्षकांत तीव्र असंतोष

सांगली – बचत योजनेच्या बाबतीत अधिकृत एजंटाकडून सामान्य जनतेला आणि नोकरांना कसे पिडले जाते याची अनेक उदाहरणे यापूर्वी दै. प्रभातमधून प्रसिद्ध झाली आहेत. नुकतेच स्कूलबोर्ड शासनाधिकाऱ्याने सर्व शिक्षकांनी मार्चच्या पगारातून 15 रु. बचत योजनेस द्यावयास पाहिजे असे सर्क्‍युलर काढले असून सर्व तालुका मास्तरांनी ही रक्‍कम कापून घेऊन मगच पगार द्यावा अशी तोंडी आज्ञा केल्यामुळे तालुका मास्तरांनी शिक्षकांवर जबरदस्ती चालविली आहे.

बॅंकेचा हप्ता, दिवाळी ऍडव्हान्सचा हप्ता जाऊन 30-35 रुपये पगार घेणारे कितीतरी शिक्षक आहेत त्यांच्या पगारातून एकदम 15 रुपये कापून घेतल्यास त्यांनी महिनाभर काय करावे? असा सवाल अनेक शिक्षक विचारत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.