नवी दिल्ली: सीमा सुरक्षा दलाच्या दिल्ली येथील मुख्यालयातील एक कर्मचारी करोनाग्रस्त आढळून आल्यानंतर प्रशासनाने या मुख्यालयाचे दोन मजले सील केले आहेत. मुख्यालयाची ही आठ मजली इमारत सीजीओ कॉम्पलेक्स लोधी रोड येथे आहे. तेथेच सीआरपीएफचेही मुख्यालय आहे.
सीआरपीएफ मुख्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना करोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काल रविवारी तेथील मुख्यालयही सील करण्यात आले होते. आज बीएसएफ मुख्यालयातील दोन मजले सील करण्यात आले आहेत. आता तेथे औषध फवारणी करून तो भाग सॅनिटाईज्ड केला जात आहे. त्यामुळे सध्या बीएसएफ मुख्यालयात अगदी कमी कर्मचारी वर्ग तैनात करून अन्य मजल्यावरून कामकाज सुरू ठेवण्यात आले आहे. आज ज्या कर्मचाऱ्याला करोना झाल्याचे आढळून आले आहे त्या कर्मचाऱ्याच्या संपर्कातील लोकांच्याही चाचण्या घेतल्या जात आहेत.