सिंगापूर -सिंगापूरमध्ये राहत असलेल्या सुमारे 4 हजार 800 भारतीयांना करोनाबाधा झाली आहे. अर्थात, त्यांच्यात सौम्य लक्षणे आढळली आहेत. त्यातील बहुतांश बाधितांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
सिंगापूरमधील करोनाबाधितांची संख्या 19 हजारांच्या घरात पोहचली आहे. त्यामध्ये परदेशी नागरिकांची संख्या मोठी आहे. सिंगापूरमध्ये परदेशी नागरिकांच्या वास्तव्यासाठी विशेष वसतिगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या वसतिगृहांत राहणाऱ्यांचे प्रमाण करोनाबाधितांमध्ये मोठे आहे. त्याला भारतीय नागरिकही अपवाद ठरलेले नाहीत. तेथील करोनाबाधित भारतीयांमध्ये 90 टक्क्यांहून अधिक कामगार आहेत. करोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर सिंगापूरमध्ये राहत असलेल्या 3 हजार 500 हून अधिक भारतीयांनी भारतीय उच्चायुक्तालयाशी संपर्क साधला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
काहींनी भारतात परतण्यासाठी तर काहींनी राहण्या-खाण्याच्या व्यवस्थेसाठी तो संपर्क साधल्याचे समजते. सिंगापूरमध्ये करोनाने आतापर्यंत 18 रूग्णांचा बळी घेतला आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सिंगापूरमध्येही विविध प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आता ते निर्बंध शिथिल करून 12 मेपासून काही व्यवसाय सुरू करण्याची सिंगापूरची योजना आहे.