2 कोटी रुपयांची जिल्हा परिषदेची तरतूद
पुणे – करोनामुळे बंद असलेल्या शाळा सप्टेंबर महिन्यात सुरू करण्याबाबत राज्य शासन विचार करत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ऑनलाइन शाळा सुरू करण्यावर प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांना ई-लर्निंगद्वारे शिक्षण मिळण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्न करत आहे. पहिल्या टप्प्यात पाचशे शाळांना स्मार्ट टीव्ही पुरवण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यास सर्व साधारण सभेने मंजुरी दिली.
या प्रस्तावामध्ये स्मार्ट टीव्ही देण्यासाठी शाळांची पटसंख्या ही शंभरपेक्षा अधिक असली पाहिजे अशी अट शिक्षण विभागाने ठेवली होती. त्यावर आदिवासी भागात ज्या शाळांची पटसंख्या कमी आहे, त्यांनी काय करायचे? असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी उपस्थित करत या मुलांनाही ई-लर्निंगद्वारे शिक्षण मिळावे, अशी मागणी केली.
त्यावर अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी जिल्हा परिषद सदस्यांनी शाळांबाबत शिफारस करावी, त्यानुसार स्मार्ट टीव्ही वाटप करण्यात येईल, असे सांगण्यात आले. इंटरनेटचा वापर करून मोबाइल टीव्हीला जोडून किंवा अभ्यासक्रमावर आधारित वेगवेगळे व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवणे शक्य होईल.