सौगत रॉय यांच्या वक्तव्याने लोकसभेत गदारोळ

निर्मला सीतारामन यांच्या वेषभूषेवरून केली होती टीका

नवी दिल्ली – तृणमूल कॉंग्रेसचे ज्येष्ठ सदस्य सौगत रॉय यांनी बॅंकिंग रेग्युलेशन दुरुस्ती विधेयकावरील चर्चेत बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विषयी केलेल्या एका वक्तव्याने लोकसभेत चांगलाच गदारोळ झाला.

भाजपच्या सदस्यांनी त्यांच्या या वक्तव्याला आक्षेप घेतल्याने सभापती ओम बिर्ला यांनी त्यांचे हे वक्तव्य सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकले. तथापि, आपण काहीच असंसदीय किंवा वावगे बोललो नव्हतो भाजपच्या सदस्यांनीच नाहक कांगावा सुरू केला आहे, अशी प्रतिक्रिया रॉय यांनी दिली आहे.

बॅंकिंग रेग्युलेशन दुरुस्ती विधेयकावरून सभागृहातील चर्चेत भाग घेताना सौगत रॉय यांनी देशातील अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरूनही निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केली. रॉय यांनी महिलांचा अवमान केला असून त्यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या सदस्यांनी केली. 

अर्थमंत्र्यांच्या व्यक्तिगत पोषाखावरून कोणतीही टिप्पणी करणे अभद्रपणाचे असून याप्रकरणी त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे प्रतिपादन संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले. संसदेच्या या चालू अधिवेशनात एकूण 18 विधेयकांवर चर्चा होणार असून बाकीच्या साऱ्या प्रथा दूर सारून या विधेयकांवरील चर्चेला सभागृहात सुरुवात करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.