आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रतिक्रिया
सातारा – एका नेत्याने सातारा शहरातील पोवई नाक्यावरील एका इमारतीच्या भिंतीवर स्वत:चे चित्र काढून घेतले, तर दुसऱ्या नेत्याने तेथेच आयलॅंड उभारण्याचा आग्रह धरला आहे. हे प्रकार नेत्यांच्या “इगो’मुळे होत आहेत. या नेत्यांच्या अहंकाराचा फटका सातारकर आणि शिवभक्तांना बसत आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली.पोवई नाका परिसरात आयडीबीआय बॅंकेच्या जुन्या आयलॅंडच्या जागेवर नवीन आयलॅंड बसवण्याचा हट्ट पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी धरला आहे. त्यावरून साताऱ्यात शिवभक्तांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
या वादाच्या पार्श्वभूमीवर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली. आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, एकाने पोवई नाक्यावरील इमारतीच्या भिंतीवर स्वत:चे चित्र काढून घेतले. आता दुसऱ्या नेत्याने पोवई नाक्यावरच आयलॅंड उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या दोन्ही नेत्यांच्या “इगो’मध्ये सातारकर आणि शिवभक्त गुंतून पडले आहेत. या प्रकरणात खा. उदयनराजे भोसले सामंजस्याची भूमिका घेतील, असे वाटत नाही. उदयनराजे यांचे चित्र भिंतीवर काढण्यामुळे बरेच राजकीय वादंग झाले होते. आधी चित्र काढले, नंतर चित्रकाराला विचारण्यात आले. पुन्हा चित्र थांबवण्यात आले.
उदयनराजे यांच्याकडून सामंजस्याची अपेक्षा नाही, कारण ते कायम स्वतःच्या विश्वात असतात. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज या युगपुरुषांच्या संदर्भात कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीच या प्रकरणी सामंजस्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा आहे.