राहुरी | राहुरी तालुक्यात बियाणे विक्रीचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारीची दखल घेत कृषी कार्यालयाने तीन दुकानांवर धडक कारवाई केली आहे. यातील दोघांचे परवाने रद्द केल्यानंतर तिसर्या दुकानाचाही परवाना रद्दसाठी सुनावणी सुरू असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी दिली आहे. राहरी तालुक्यात शेतकर्यांची खरिपासाठी लगबग सुरू झाली आहे. मान्सून यंदा लवकर येणार असल्याचे समजताच शेतकर्यांची कृषी केंद्रावर गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहे. राहुरीत यंदाच्या खरीप हंगामात कपाशीला अच्छे दिन येणार या अपेक्षेने कपाशी बियाणांकडे वाढता कल काळाबाजारासाठी पोषक ठरल्याचे चित्र आहे. कृषी सेवा केंद्राकडे कपाशीच्या 7067 या वाणाला अधिक पसंती मिळत असल्याने बहुतेक शेतकरी त्याच वाणासाठी आग्रही आहेत. परिणामी वाढती मागणी लक्षात घेता काही कृषी सेवा केंद्र चालकांनी शेतकर्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम सुरू केल्याची चर्चा आहे. याबाबतच्या तक्रारी कृषी विभागाकडे जाताच कृषी अधिकारी शिंदे यांनी तत्काळ पथके नेमण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार शिंदे यांनी प्रत्येक मंडळामध्ये कार्यरत असलेल्या कृषी सेवकांना दुकानांमधील खरेदी विक्रीवर वॉच ठेवण्याचे आदेश दिले होते. तसेच राहुरी तालुक्यामध्ये भरारी पथकाची नेमणूक करीत दुकानांवर छापेमारी सुरू केली. दरम्यान, मांजरी येथील शेतकरी कृषी सेवा केंद्र व चंद्रगिरी कृषी सेवा केंद्रावर अधिक दराने बियाणे विक्री झाल्याचे उघडकीस आले. याबाबत नोटिसा देत कृषी विभागाकडून सुनावणी घेण्यात आली. दोषी ठरलेल्या दोन्ही कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द केल्याचा आदेश कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. याप्रमाणेच कोपरे (बोरी फाटा) येथील हरि ओम कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात आली. संबंधित दुकानातही शेतकर्यांकडून अधिक दर देत बियाणे विक्री केल्याचा ठपका ठेवत कृषी विभागाने परवाना रद्दची प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबत सुनावणी सुरू असल्याची माहिती कृषी अधिकारी शिंदे यांनी दिली.