सातारा -जिल्हा परिषदेचे 2022 -23 या वर्षात अपेक्षित जमा 50 कोटी रुपये विचारात घेऊन 49 कोटी 99 लाख रुपयांचे मूळ अंदाजपत्रक जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी शुक्रवारी ठराव समितीसमोर मांडले. गेल्यावर्षीच्या तुलनेत 9 कोटी रुपयांच्या वाढीव तरतुदी या अंदाजपत्रकात आहेत. प्रत्येक तालुक्यात मॉडर्न स्कूलसाठी तीन कोटी तर जिल्हा परिषद मालकीच्या जागा विकसित करण्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांचा कार्यकाल दि. 20 मार्च रोजी संपल्याने दि. 21 मार्चपासून विनय गौडा यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे. दि. 31 मार्चपूर्वी अर्थसंकल्प सादर करणे बंधनकारक असल्याने शुक्रवारी गौडा यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी सभागृहात ठराव समितीची बैठक झाली. तीमध्ये गौडा यांनी 50 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.
2021- 22 या वर्षाचे 40 कोटी 98 लाख 10 हजार रुपयांचे मूळ अंदाजपत्रक होते. 78 कोटी 59 लाख रुपयांचे अतिम सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. गतवर्षी करोनाचा प्रादुर्भाव असल्याने जिल्हा परिषदेच्या स्वमालकीच्या उत्पन्नात घट झाली होती. आता करोनाचा प्रादुर्भाव संपल्याने उत्पन्न वाढ झाली आहे. जिल्हा परिषदेचे स्वनिधीचे महसुली उत्पन्न 50 कोटी रुपये गृहित धरण्यात आले असून 49 कोटी 99 लाख महसुली खर्चाचे अंदाजपत्रक सर्व विभागांचा समतोल राखून तयार करण्यात आले आहे. मूळ अंदाजपत्रक एक लाख रुपये शिल्लकीचे असल्याचे विनय गौडा यांनी यावेळी सांगितले.
शिक्षण विभागासाठी 4 कोटी 80 लाख एवढी तरतूद प्रस्तावितकरण्यात आली असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षण घेतलेल्या सैनिक स्कूलसाठी पात्र ठरलेल्या गुणवत्ता यादीतील पहिल्या 10 विद्यार्थ्यांचे 50 टक्के शैक्षणिक शुल्क जिल्हा परिषद सेसमधून भरण्यात येणार आहे. मूळ अंदाजपत्रकात प्रत्येक तालुक्यात एक मॉडर्न स्कूल तयार करणे ही अभिनव योजना राबवण्यात येत आहे.
प्राथमिक शाळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी 2 कोटी 25 लाख रुपयांची तरतूद केल्याचे विनय गौडा यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या स्वमालकीच्या जागा विकसित करण्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे. समाजकल्याण, कृषी, पशुसंवर्धन विभागामार्फत अनेक योजनांना बळकटी देण्यासाठी तरतुदी करण्यात आल्याचे गौडा यांनी सांगितले. विकास सावंत यांनी प्रास्ताविक केले. श्री. निंबाळकर यांनी आभार मानले.
अंदाजपत्रकातील विभागनिहाय तरतुदी
सामान्य प्रशासन – 2 कोटी 78 लाख
शिक्षण विभाग – 7 कोटी 5 लाख
बांधकाम विभाग – 13 कोटी 14 लाख 80 हजार
लघु पाटबंधारे विभाग – 1 कोटी 25 लाख
आरोग्य विभाग – 1 कोटी 4 लाख 99 हजार
कृषी विभाग – 2 कोटी 59 लाख 99 हजार
पशुसंवर्धन विभाग – 1 कोटी 20 लाख
समाजकल्याण विभाग – 1 कोटी 98 लाख 8 हजार
संकीर्ण (सामान्य) – 14 कोटी 17 लाख 6 हजार
महिला व बालकल्याण विभाग – 99 लाख 4 हजार
एकात्मिक बालविकास विभाग – 13 लाख 75 लाख
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग – 1 कोटी 50 लाख
जिल्हा परिषद मुद्रणालय – 3 कोटी 35 लाख 72 हजार