सातारा – केंद्रात खासदार उदयनराजे भोसले यांना व राज्यामध्ये आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले यांना मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्याची मागणी भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णादेवी पाटील यांनी भाजपच्या वरिष्ठ पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सौ. पाटील यांनी नमूद केले आहे की, संविधान बदलण्याबाबतचा अपप्रचार अल्पसंख्याकांमध्ये जाणीवपूर्वक निर्माण केलेले असुरक्षिततेचे वातावरण, आरक्षणावरुन निर्माण केला गेलेला संभ्रम, शेतकऱ्यांमधील नाराजी यांचा मोठ्या प्रमाणातील फटका लोकसभा निवडणुकीत भाजप व महायुतीला बसला आहे. असे असून देखील राष्ट्रवादीकडे असलेला सातारा मतदारसंघ भाजपने खेचून आणला आहे.
त्यामध्ये सातारा विधानसभा मतदारसंघाचा सिंहाचा वाटा आहे. सातारचे राजघराणे शिवप्रभूंचा वारसा सांगणारे आहे. समाजाच्या सर्व घटकात व स्तरात त्यांच्यबद्दल आत्मियता आहे. सर्वसमावेशक व विकासात्मक वृत्तीने कै. दादामहाराज, कै. भाऊसाहेब महाराज, उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे यांनी ही आत्मियता जपली व वृंदिगत केली आहे. काही अनाकलनीय कारणांमुळे गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ या राजघराण्याला मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाजप महिला मोर्चाच्यावतीने वरिष्ठांकडे केंद्रात उदयनराजे भोसले यांना व राज्यामध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्याची मागणी केली असल्याचे सौ. सुवर्णादेवी पाटील यांनी सांगितले.