अधिकृत घोषणा करणार असल्याची नितीन बानुगडे-पाटील यांची माहिती
सातारा (प्रतिनिधी) – जिल्हा बॅंक निवडणुकीच्या रणनीतीसंदर्भात शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सोमवारी शासकीय विश्रामगृहामध्ये खलबते झाली. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई व आमदार महेश शिंदे यांनी शिवसेनेच्या अनुषंगाने जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी मतदारसंघनिहाय चाचपणी केल्याचे समजते. जिल्हा बॅंकेच्या आखाड्यात शिवसेना उतरणार असून याची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे सातारा व सांगलीचे संपर्क नेते नितीन बानुगडे पाटील यांनी स्पष्ट केले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून या निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी जिल्हयातील शिवसेनेच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृहात झाली. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील, धैर्यशील कदम, शेखर गोरे, डी. एम. बावळेकर यावेळी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील मतदारसंघनिहाय सविस्तर चर्चा करण्यात आली.
कच्ची मतदारयादी, उमेदवारांची वर्गवारी याबाबतच्या चर्चेनंतर आपापल्या मतदारसंघात व कार्यक्षेत्रात कशा पध्दतीने निवडणुकीच्या अनुषंगाने काम करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा बॅंक ही प्रामुख्याने कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांच्याच ताब्यात राहिली आहे. गेल्या चौदा वर्षापासून बॅंकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असून आजपर्यंत शिवसेनेला बॅंकेवर कधी संधी मिळाली नाही.
महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेला बॅंकेवर प्रतिनिधित्व मिळावे, असा शंभूराज देसाई यांचा आग्रह आहे. त्या दृष्टीने 3 सप्टेंबरनंतर कोणती रणनीती आखायची या विषयावर चर्चा करण्यात आली. पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेची जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत अधिकृत घोषणाही लवकरच करण्यात येईल, असे प्रा. नितीन बानगुडे- पाटील यांनी माध्यमांना सांगितले.