फलटण – मराठा आरक्षणासाठी फलटण येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणास तालुक्यातील विविध संघटना आणि मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला आहे. या साखळी उपोषणाला फलटण तालुक्यातून पाठिंबा वाढत आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी, शनिवारी फडतरवाडी, चौधरवाडी व गारपीरवाडी येथील मराठा समाजातील पुरुष व महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून प्रांताधिकारी सचिन ढोले यांना निवेदन दिले.
आमच्या आरक्षणाचा प्रश्न सरकार दरबारी मांडावा. राज्य सरकारने ओबीसी प्रवर्गातून आम्हाला आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. फलटण तालुक्यातील ताथवडा, सांगवी, माझेरी, बिबी, निरगुडी, सस्तेवाडी, पिराचीवाडी, गिरवी, निंभोरे, आसू, मुळीकवाडी, मिरढे, राजाळे, शेरेचीवाडी, ढवळ, धुमाळवाडी, वाठार निंबाळकर, ढवळेवाडी (निंभोरे), सुरवडी, जिंती, तडवळे, तांबवे, सासवड, घाडगे मळा, झडकबाईचीवाडी, नांदल, राजुरी, तरडगाव, कुरवली खुर्द, चव्हाणवाडी, विडणी, टाकुबाईचीवाडी, वाघोशी, भिलकटी, पिंप्रद, फडतरवाडी, चौधरवाडी, खराडेवाडी या गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
फलटण येथील साखळी उपोषणात शनिवारी ताथवडा, सांगवी, निंबळक, टाकळवाडे, नाईकबोमवाडी, साठे फाटा, आसू, राजुरी, पिराचीवाडी, गोळेगाव, तामखडा, हनुमंतवाडी, शिंदेनगर व तावडी येथील मराठा बांधव सहभागी झाले होते. मराठा समाजातील मान्यवरांनी मते व्यक्त करताना, मराठा समाजाला ओबीसीतून लवकरात लवकर आरक्षण द्यावे, अशी मागणी केली. हे उपोषण म्हणजे मराठा आरक्षणासाठी अंतिम उपाय आहे. आरक्षण मिळेपर्यंत सर्व निवडणुकांमध्ये मतदनावर बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा मराठा समाजाच्यावतीने देण्यात आला आहे.