भवानीनगर, (वार्ताहर) – वाढदिवसाला फळं कापून शेतकर्यांना मोठे करा, मदत करा, केकऐवजी कलिंगड कापा, खरबूज कापा, सफरचंद, पेरू, पपई, सीताफळ, आंबा या फळांचा वाढदिवसाच्या निमित्ताने केक सारखाच वापर करा यामुळे शेतकर्यांच्या पिकाला बाजार मिळेल व शेतकरी आत्महत्या रोखायला मदत होईल.
कारण दररोज असंख्य लोकांचे वाढदिवस साजरे होत असतात आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने केक ची किंमत दोन तीनशे रुपये तरी सहज असते आणि यापैकी एकही फळ तीनशे रुपये किलो नाही तसेच आपल्या आरोग्यासाठी सुद्धा केमिकल युक्त केक ऐवजी फळांचा वापर केला तर फळे ही निश्चितच आरोग्यदायी आहेत, असे गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त प्रकाश शिंदे यांनी सांगितले.
सणसर (ता. इंदापूर) येथील महाराष्ट्र शासन नियुक्त विशेष कार्यकारी अधिकारी व महाराष्ट्र शासन गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त प्रकाश शिंदे यांचा अनोख्या पद्धतीने कलिंगड, खरबूज व पपई ही फळे कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी इंदापूर अर्बन बँकेचे संचालक बाबा निंबाळकर, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगरचे इन्चार्ज स्टोअर किपर नंदकुमार चांदगुडे, इंदापूर तालुका शिवसेना उपप्रमुख विजय शिरसट, जगदीश कांबळे, सणसर गाव तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष दत्तात्रय काळे,
शरद कांबळे, अक्षय निंबाळकर, सुमित निंबाळकर, विजय भाग्यवंत, रणजीत राजेभोसले इत्यादी उपस्थित होते. वाढदिवसा दिनी अंधानुकीकरण करून जर पाश्चात्य देशातल्या संस्कृतीचा वापर करून देशाच्या संस्कृतीला आपण बाधा तर आणीत नाही ना, याचा तरूणांनी विचार केला पाहिजे.
शहरांमध्ये असंख्य लोक केक वरती खर्च करतात, केमिकल युक्त व विविध रसायने युक्त केक तोंडाला लावतात, उरलेला केक फेकून देतात. परंतु जर वाढदिवसानिमित्त केक ऐवजी फळांचा वापर केला तर आपले मित्र जे आपला वाढदिवस सेलिब्रेशन करण्यासाठी आलेले असतात ते आरोग्यदायी फळांची चव आनंदाने चाखू शकतात आणि तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना उत्तम आरोग्यदायी आहार मिळू शकतो. हा पण आजच्या युवकांनी कुठेतरी याचा विचार केला पाहिजे. असा क्रांतिकारी सामाजिक संदेश याप्रसंगी देण्यात आला. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व परिसरातून कौतुक केले जात आहे.