सातारा – राज्यात राबविण्यात आलेल्या “हर घर झंडा’ मोहिमेमुळे सातारा पालिकेच्या तिजोरीत चांगलीच भर पडली. 9638 सातारकरांनी 100 टक्के घरपट्टी भरल्याने एक एप्रिल ते 17 ऑगस्ट या कालावधीत सातारा पालिकेला सात कोटी 21 लाख 84 हजार 343 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. पालिकेचा वसुली विभाग अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे वसुली करणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
सातारा पालिकेने शंभर टक्के घरपट्टी भरणाऱ्या नागरिकांना तिरंगा झेंडा मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 1 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान सातारा पालिकेला शंभर टक्के घरपट्टी भरणाऱ्या नागरिकांमुळे 44 लाख रुपयांचा महसूल मिळाला.
सातारा पालिकेची थकबाकी गेल्या आर्थिक वर्षात 42 कोटी रुपयांपर्यंत रखडली होती. वसुलीचे प्रमाण अगदीच 21 टक्क्यांवर आले होते.
मात्र, यंदाच्या आर्थिक वर्षांमध्ये मुख्याधिकारी व प्रशासक अभिजित बापट व अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांच्या संयुक्त प्रयत्नाने तसेच वसुली विभागाच्या गतिमान मोहिमांमुळे वसुलीचे प्रमाण आता 40 टक्क्यांवर पोहोचले आहे.
“हर घर झंडा’ अभियानामुळे सातारा पालिकेला गेल्या साडेचार महिन्यांत सात कोटी 21 लाख 84 हजार 343 रुपये महसूल प्राप्त झाला. दरवर्षीच्या संकेताप्रमाणे एकूण थकबाकीच्या एक तृतीयांश रक्कम डिसेंबरअखेरपर्यंत पालिकेच्या तिजोरीत जमा होते. मात्र, यंदा ही रक्कम सातारा पालिकेने ऑगस्ट महिन्यातच वसूल केल्याने यापुढेही अशा वेगवेगळ्या माध्यमातून महसुलाचा आकडा वाढवणार असल्याचे अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांनी सांगितले.