गाढवाच्या मालकावर गुन्हा दाखल
मायणी – पाळीव गाढवाने चावा घेतल्याने येथील माहिरा मोहसीन मुजावर ही अडीच वर्षाची चिमुरडी गंभीररीत्या जखमी झाली आहे. गाढवाचे मालक राजेंद्र मारुती धोत्रे (रा. इंदिरानगर, मायणी) यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील एसटी बस स्थानक परिसरात मोहसीन रसूल मुजावर हे चुरमुरे व्यापारी परिवारासह रहात आहेत. बस स्थानकास लागूनच असलेल्या बाजार पटांगणावरील तांबोळी हॉटेलच्या पाठीमागील रोडवर मुजावर यांची अडीच वर्षांची मुलगी माहिरा खेळत होती. त्यावेळी सकाळी साडेदहाच्या सुमारास तेथे राजेंद्र धोत्रे यांच्या मालकीचे गाढव फिरत आले.
रोडवर खेळणाऱ्या चिमुरडीला काही कळण्याआधीच गाढवाने अचानक तिचा चावा घेतला. डोक्याच्या डाव्या बाजूस चावा घेतल्याने मुलगी गंभीररीत्या जखमी झाली. काही अंतर गाढवाने तिला फरफटही नेले. त्यावेळी तेथील काही रहिवाशांनी मुलीची गाढवापासून सुटका केली. जखमी झालेल्या मुलीस विटा, मिरज व त्यानंतर कऱ्हाड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
गाढवास मुसके न घालता व सुरक्षिततेबाबत कोणतीही उपाययोजना न करता मालक धोत्रे यांनी हलगर्जीपणा करून गाढवास मोकाट सोडले. त्यामुळेच मुलगी गंभीररीत्या जखमी झाल्याची फिर्याद मुलीचे वडील मोहसीन मुजावर यांनी पोलिसात दिली आहे. पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गंबरे पुढील तपास करीत आहेत.