कोयनानगर – मौजे मुनावळे येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत सादर करण्यात आलेल्या शिवसागर जलाशयात जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित करण्याच्या 45.38 कोटी रुपयांच्या प्रस्तावास सह्याद्री व्याघ्र राखीवच्या स्थानिक सल्लागार समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच कोयना व वारणा नदी पात्रामध्ये स्थानिकांना रोजगाराच्या नविन संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षणांती विविध जलपर्यटन विषयक उपक्रम सुरू करण्यासही समितीने मान्यता असून व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील सर्व पर्यटन उदयोगासंबंधी निवास सुविधांकडून नियमानुसार कंझर्वेशन फी घेणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
बुधवार, दि. 18 रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे विभागीय आयुक्त, पुणे सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरची बैठक झाली. बैठकीस वनसंरक्षक आर.एम. रामानुजम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सांगली जिल्हाधिकारी माटंडा राज दयानिधी, कोल्हापूर जिल्हाधिकारी राहूल रेखावार, कोयना उपसंचालक उत्तम सावंत, चांदोली उपसंचालक स्नेहलता पाटील, डॉ. सारंग कुलकर्णी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अमोल सातपुते, के.एम. पाटील, पोलीस उपअधिक्षक सातारा एच.आर. म्हेत्रे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी व तहसीलदार, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, सुनिल भोईटे, निलेश बापट, यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत दि. 21 सप्टेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयाअन्वये, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व सभोवतालचे क्षेत्रातील निसर्ग पर्यटन धोरण ठरविणे, तसेच बफर क्षेत्रातील विकास कामांचे संनियंत्रण करणे व व्याघ्र प्रकल्पाच्या आत व भोवतालच्या इमारती इ. साठी मानके निर्माण करणे, निसर्ग पर्यटन आराखडयास मान्यता देणे, व्याघ्र प्रकल्पाची सापेक्ष पर्यटन वहन क्षमता, स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य शासनाला, पर्यटन संस्थांना निसर्ग पर्यटन विषयक सल्ला देणे, पर्यटन क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या गतीविधी नियंत्रित करून त्यांचे निर्धारण करणे व याबाबत राज्य शासनाला सल्ला देणे, स्थानिक पर्यटन व्यवस्थापक, पर्यावरणाला, तसेच वन्यप्राण्यांना कोणत्याही प्रकारची हानी अथवा त्रास न देता पर्यटन करणे यावर संनियंत्रण ठेवणे याकरिता 35 सदस्यसीय स्थानिक सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे.
त्याअनुषंगाने सहयाद्री व्याघ्र प्रकल्प निसर्ग पर्यटन विकासाच्या दृष्टीने सदर बैठकीत अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्हयातील सहयाद्री व्याघ्र राखीवच्या बफर क्षेत्रात येणाऱ्या अनेक गावांना निसर्ग पर्यटनातून रोजगार व उत्पन्न वाढीसाठी मोठया प्रमाणात संधी निर्माण होणार आहेत.
व्याघ्र राखीवच्या बफर क्षेत्रामधील गोकूळ तर्फ हेळवाक येथील पोलिस विभाग सातारा यांचे नियोजित महाराष्ट्र पर्यटन पोलीस प्रशिक्षण केंद्र व राज्य आपत्ती बचाव दल, उपविभागीय अधिकारी पाटण यांच्यामार्फत सादर करण्यात आलेल्या देशमुखवाडी व मोडकवाडी याठिकाणी भूस्खलन झालेल्या गावांचा पुर्नवसन प्रस्ताव बफर क्षेत्रामध्ये निसर्ग पर्यटनमध्ये स्थानिकांच्या सहभागाच्या अनुषंगाने नियमावली तयार करून ग्रामसभेच्या मान्यतेने ग्रामपरिस्थितीकीय विकास समिती मार्फत बफर क्षेत्रामध्ये पर्यटन व्यवस्थापन करणे इ प्रस्तावांना समितीने मान्यता दिली सुनावले येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था, सामाजिक संस्था तसेच इतर स्थानिकांना निसर्ग पर्यटन विषयक उपक्रम परवानगी देण्याकरिता नियमावली तयार करून परवानगी देण्यास हरकत नसलेसे समितीने ठरविले.
प्रवेश फी मध्ये सवलत
सह्याद्री व्याघ्र राखीवने मांडलेल्या व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्र, तालुका, जिल्हा व आणि राज्यातील विद्यार्थ्यांना सहयाद्री व्याघ्र राखीवच्या प्रवेश फी मध्ये अनुक्रमे 100 टक्के, 75 टक्के, 50 टक्के, 25 टक्के सवलत व बफर क्षेत्रातील स्थानिकांना 50 टक्के सवलत देण्याचा प्रस्तावासही मान्यता देण्यात आली.
प्रस्तावित पाच निसर्ग पर्यटन झोनला मान्यता
या बैठकीत सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्राकरिताच्या सन 2023-24 ते 2032-33 या कालावधीसाठीच्या निसर्ग पर्यटन आराखडयास मान्यता देण्यात आली. तसेच व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार असलेल्या सातारा जिल्हयातील प्रस्तावित पाच निसर्ग पर्यटन झोनला मान्यता देण्यात आली. यामध्ये कांदाट, मुनावळे – बामणोली, कारवट- कुसवडे, कोयना हेळवाक, पानेरी भोसगाव, सांगली जिल्हयातील एक निसर्ग पर्यटन झोन मणदूर, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्हयात मिळून असलेला एक निसर्ग पर्यटन झोन आंबा अशा एकूण सात निसर्ग पर्यटन झोन आणि झोन निहाय असलेल्या निसर्ग पर्यटन संकुल, निसर्ग पर्यटन स्थळे आणि पर्यटन वाढीस पूरक उपक्रम यांना मान्यता देण्यात आली.