सातारा – सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने आयोजित सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा उद्या रविवारी दि. 18 रोजी होत असून या स्पर्धेमुळे संपूर्ण सातारा शहर मॅरेथॉनमय झाले असून स्पर्धेसाठी पोषक वातावरण निर्मिती झाली आहे. या स्पर्धेची खास बाब म्हणजे 2012 मध्ये झालेल्या पहिल्या अर्धमॅरेथॉन स्पर्धेमध्ये केवळ 12 सातारकर सहभागी झाले होते. यावर्षी सातारकरांनी तीन हजारांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये महिलादेखील उस्फूर्तपणे व तेवढ्याच तयारीने स्पर्धेत आपला सहभाग नोंदवून साताऱ्याची नवी ओळख करून देत आहेत.
स्पर्धेच्या शुभारंभासाठी सकाळी साडेसहा वाजता तसेच स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभासाठी सकाळी 9 वाजता खासदार उदयनराजे भोसले, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेचा शुभारंभ पोलीस परेड ग्राउंड येथून होणार आहे. स्पर्धा पोवई नाका, रयत शिक्षण संस्था, नगरपरिषद, अदालतवाडा, समर्थ मंदिर, बोगदा, पॉवर हाऊस, यवतेश्वर घाटातून, हॉटेल निवांत, प्रकृती आयुर्वेदिक हिल रिसॉर्ट व नित्यमुक्त साई रिझॉर्टपर्यंत जाऊन पुन्हा त्याच मार्गाने पोलीस परेड ग्राउंड येथे समाप्त होईल. फौंडेशनच्यावतीने स्पर्धेच्या मार्गावर स्पर्धकांना पाणी, औषधे, बिस्कीट, वेदनाशामक स्प्रे, कुलिंग स्टेशन इत्यादीची व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांसाठी फूड पॅकेट्सची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धकाला काही त्रास झालाच तर त्वरित प्रथमोपचार करण्याबाबतचे प्रशिक्षण स्वयंसेवकांना देण्यात आले आहे. त्याशिवाय मार्गावर सुसज्ज रुग्णवाहिका तैनात आहेत, अशी माहिती स्पर्धेचे मेडिकल डायरेक्टर डॉ.प्रतापराव गोळे, डॉ. पौर्णिमा फडतरे व डॉ. स्वप्ना शेडगे यांनी दिली. सातारकर नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा व स्पर्धेदरम्यान सहकार्य करावे, असे आवाहन सातारा रनर्स फौंडेशनच्या रेस डायरेक्टर डॉ. पल्लवी पिसाळ, फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुचित्रा काटे, संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे, उपाध्यक्ष डॉ. रंजिता गोळे, सचिव डॉ. अदिती घोरपडे तसेच संयोजन समितीमधील सर्व सदस्यांनी केले आहे.
सुयोग्य आणि शिस्तबद्ध नियोजन, तसेच निसर्गरम्य डोंगररस्त्यावरून जाणारा स्पर्धेचा मार्ग यामुळे ही स्पर्धा जगभरातील सर्व स्पर्धकांच्या पसंतीला उतरली आहे. स्पर्धेच्या मार्गावर स्पर्धकांना उत्तेजन देण्यासाठी चिअरिंग टीम ठेवण्यात आल्या आहेत. या चिअरिंग टीमच्या माध्यमातून ढोल ताशा, लेझीम पथक तसेच पारंपरिक वाद्य वाजवून स्पर्धकांचा उत्साह वाढवणार आहेत. चिअरिंग टीमसाठी स्पर्धादेखील ठेवण्यात आल्या असून उत्कृष्ट चिअरिंग देणाऱ्या टीमसाठी पारितोषिक ठेवण्यात आली आहेत.
पोलीस विभागाच्यावतीने स्पर्धेचा उदघाटन सोहळा, स्पर्धेच्या मार्गावरील वाहतूक व्यवस्था व बक्षीस वितरणाच्यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. स्पर्धेदिवशी एसटी महामंडळाने कास, बामणोली तसेच परळी, सज्जनगड इत्यादी ठिकाणी मुक्कामी असणाऱ्या एसटी बसेस नेहमीच्या वेळापत्रकानुसार न सोडता स्पर्धा संपल्यानंतर सोडाव्यात, अशी विनंती संयोजकांतर्फे एसटी महामंडळाला करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्यावतीने 108 ची रुग्णवाहिका सेवा तसेच दोन चाकी रुग्णवाहिकादेखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. वन विभागाने कास पठारावर येणाऱ्या पर्यटकांनी यापूर्वीच संकेतस्थळावरून ऑनलाइन बुकिंग केले आहे, त्यांनी रविवारी सकाळी 11 वाजल्यानंतर कास पठाराला भेट द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.