येरवडा, दि. 17 (प्रतिनिधी) -विमानगर फिनिक्स चौकातील पूरस्थितीवर उपाययोजनेसाठी 2019 मध्ये “स’यादीतून दोन कोटींचा निधी मंजूर होता. यातून कलव्हर्ट करण्यात येणार होते. ज्यामुळे रस्त्यावर पावसाचे पाणी साचले नसते. या कामाची निविदा प्रसिद्ध होऊन ठेकेदारांनी निविदा भरली होती. सर्व कागदाची पूर्तता झाली होती. त्यानंतरही 2020 मध्ये या कामासाठी एक कोटींचा निधी मंजूर झाला. पण, यासाठीही अतिरिक्त आयुक्तांनी मान्यता दिली नाही. मान्यतेच्या सहीसाठी काम रखडले. आता ही फाइल रस्ता विभागाकडे आहे. पालिकेच्या वेगवेगळ्या विभागाकडून होणाऱ्या मान्यतांची पूर्तता झालेली नसल्याने ही फाईल अन्य फाइल खाली दबली गेल्याने फिनिक्स चौकात प्रयेक पावसात पाणी साचण्याचे समस्या कायम असल्याचे माजी नगरसेविका श्वेता खोसे-गलांडे यांनी सांगितले.
नगररोड वरील विमाननगर मधून फिनिक्स मॉल जवळून सोपाननगर येथील ओढ्यात पावसाचे पाणी जाते. नगररस्त्याचे सहा पदरीकरण झाले. त्यानंतर बीआरटी मार्ग झाला. या कामामुळे नगररोडवरील ओढा गायब झाला. त्यामुळे दरवर्षी या ठिकाणी पाणी साचते. या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी माजी नगरसेविका श्वेता खोसे-गलांडी यांनी “स’यादीतून दोन कोटीचा निधी मंजूर केला होता. निविदा प्रकियाही पूर्ण झाली होती. मात्र, पालिका प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे निधी मंजूर होऊनही येथील नाल्याचे काम झालेले नाही.
विमाननगर फिनिक्स मॉल येथे कल्व्हर्ट करण्यासाठी मी दोन कोटींचा निधी दिला होता. याबाबत सर्वसाधारण सभेमध्ये अधिकाऱ्यांना विचारणा केली होती. तत्कालीन आयुक्त सौरभ राव यांनी कामाचे गांभीर्य लक्षात घेऊन काम सुरू करण्याची सूचनाही केली होती. त्यानंतरही काम सुरू केले गेले नाही. याबाबत आयुक्तांची भेट घेणार आहे.
– श्वेता खोसे-गलांडे, माजी नगरसेविका