नेवासा- खडका रस्त्याचे तीन तेरा केव्हाच वाजले आहेत. राजकीय मंडळींसह संबधित अधिकारी वर्गाने या रस्त्याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने प्रवासी व वाहनधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांची हाडे मोडकळीस आली आहेत. आता गरोदर महिलांनी या रस्त्यावरून प्रवास करण्याचे बंदच केले आहे. खड्ड्यात लोप पावत असलेल्या खडका रस्त्याचा धसला घेतला आहे.
नेवासा – खडका हा रस्ता नेवासा शहरातील मार्केट यार्डपासून खडक्याकडे जातो. या पाच किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरणासाठी विविध क्षेत्रातील, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून आंदोलने करण्यात आली. तर काहींनी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. या रस्त्याचे अनेक वर्षांपासून वाटोळे झालेले आहे. मध्यंतरी कधीमध्ये थिगळं लावण्याचा प्रयत्न केला गेला.
पंरतु कायमस्वरूपी खडका रस्त्याचे भाग्य अद्याप उजळले गेलेले नाही. ठिकठिकाणी खड्डे असल्याने प्रवास करताना यश याठिकाणी रस्ताच नसल्याचे जाणवत आहे. देवगड, गंगापूर, मराठवाड्यातील गावांना जाण्याचा हा सोपा व जवळचा मार्ग आहे. मोठय़ा प्रमाणावर नागरिकांचा प्रवास या खडका रस्त्यावरून असतो. पश्चिमेकडील राहुरी, श्रीरामपूर आदी भागातील दशक्रियाविधी साठी प्रवरासंगमच्या रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या नागरिकांचा राबता मोठ्या प्रमाणावर आहे.
आता रस्ताच असून नसल्यासारखा झालेला असल्याने वाहनधारकांचे, नागरिकांचे, शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. या परिसरातील शेतकरीही पूर्णपणे वैतागला आहे. शालेय विद्यार्थी, दूध उत्पादक, परिसरातील कामगार, मजूर वर्ग, देवगडला जाणारा भाविकांबरोबरच गरोदर महिलांना या खडका रस्त्याचा झटका बसत आहे. लहान मोठे अपघात होत आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत आहे.
अनेकांचा बळी या खड्ड्यांमुळे झालेला आहे. कोणालाच या रस्त्याचे सोयरसुतक नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. खराब रस्ता व रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण जास्त असल्याने दवाखान्यात जाणाऱ्या गरोदर असलेल्या महिलांना चांगलेच धक्के बसत असल्याने या महिलांत संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. खडका रस्त्यावरून बाळंतपणासाठी जाणाऱ्या गरोदर महिलांनी जाणेच बंद केले आहे. रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी संंबंधित विभागाने तातडीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
-खडका रस्त्यासाठी मुहूर्त कधी लागणार?
नेवासा – खडका रस्त्यांची केव्हा तरी डागडुजी केली जाते. मजबुतीकरणासाठी प्रयत्न होत नाहीत. मुहूर्त कधी लागणार आहे. सर्वांनीच रस्ता दुरुस्तीसाठी दुर्लक्ष केल्याने आता सर्वासमावेत मोठे आंदोलन उभारावे लागणार आहे.
– अनिल ताके, कोटसामाजिक कार्यकर्ते, नेवासा
दत्त जयंतीला जाणाऱ्या भाविकांची परवड होणार!
डिसेंबर महिन्यात देवगडला दत्त जयंती मोठा महोत्सव होणार आहे. खडका रस्त्यावरील मधला खलालप्रिंपी रस्ता रखडला होता. त्याचे काम सुरू असल्याने अडचणी येणार आहेत. तर देवगडला जाणाऱ्या भाविकांची खडका रस्त्याचीही दुरावस्था झाल्याने परवड होणार आहे.