सातारा – सातारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला स्वराज्याचे दुसरे छत्रपती “श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा’ असे नाव देण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. या निर्णयाचे मी स्वागत करतो. ऐतिहासिक सातारानगरीतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वास्तूस समर्पक नाव दिल्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा योग्य सन्मान झाला आहे, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
याबाबतच्या पत्रकात उदयनराजे यांनी म्हटले आहे की, माझ्या अथक प्रयत्नांमुळे आणि सर्वांच्या सहकार्याने सातारचे वैद्यकीय महाविद्यालय 2014 साली मंजूर झाले. त्यासाठी 500 खाटांचे रुग्णालय, 100 खाटांचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय मंजूर करून, अटींची पूर्तता करण्यात आली. तथापि इंडियन मेडिकल कौन्सिलच्या आणि इतर संस्थांच्या क्लिष्ट निकषांची पूर्तता करण्यात आणि त्यासाठी आवश्यक असलेली मोठी सोयीची जागा उपलब्घ करण्यात बराच कालावधी लोटला. गतवर्षी या महाविद्यालयात पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. या वैद्यकीय महाविद्यालयामुळे सातारच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचे नाव या महाविद्यालयाला देण्याची विनंती मी राज्य शासनाला एक वर्षापूर्वी केली होती. जुलै महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कराड दौऱ्यात याबाबतचा स्वतंत्र प्रस्ताव दिला होता.
तत्कालीन मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याची योग्य नोंद घेतली गेली नसल्याची खंत होती. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांच्या हातांमध्ये देशाचे भविष्य आहे. आंतरराष्ट्रीय निकषांप्रमाणे देशात सार्वजनिक आरोग्य सेवा पुरवण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. वैद्यकीय शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा मिळावी, म्हणून त्यांचे नाव या महाविद्यालयाला देण्याचा प्रस्ताव देण्यात आला. या प्रस्तावाची दाखल घेऊन राज्य शासनाने बुधवारी शासन निर्णयाद्वारे या महाविद्यालयाला “छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, सातारा’ असे नाव देण्यात आल्याचे आणि त्या अनुषंगाने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या आयुक्तांनी पुढील कार्यवाही करावी, असा निर्णय घेतला आहे. माझा प्रस्ताव राज्य शासनाने मान्य केल्याने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सातारकर जनतेच्यावतीने मी धन्यवाद देतो.