पुणे – करोनाचा पार्श्वभूमीवर वैद्यकीय आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सेवेमुळे त्यांचा सन्मान होत असताना ससून रुग्णालयातील काही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जेवणाची गैरसोय होत असून मनस्ताप सहन करावा लागत असल्याची भावना दै. “प्रभात’कडे व्यक्त केली.
या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत सोमवारी सकाळी ससून रुग्णालय आवारात ठिय्या मांडला होता.
आम्ही करोना वॉर्डमध्ये ड्युटी करत असून, सध्या आमच्या राहण्याची व्यवस्था वसतीगृहात केली गेली आहे. जेवण आणि नाष्ट्याबाबत देखील गैरसोय होत आहे. कंत्राटी ब्रदर्स आणि नर्सेसना पूर्ण पगार देखील मिळालेला नाही. याशिवाय खोल्यांची विभागणी व्यवस्थित नसल्याने, करोना होण्याचा देखील धोका आहे. रविवारी (दि.4) रात्रीपासून आमचे जेवण बंद केले आहे. त्यावेळी ससून प्रशासनाला आणि कंत्राटदारांना विचारणा केली असता, त्यांच्याकडून व्यवस्थित उत्तरे मिळाली नाहीत
खासगी कंत्राटदार आणि ससून प्रशासनाच्या नियम आणि वर्तणुकीमुळे कर्मचारी वर्ग भरडला जात आहे. यापूर्वी आम्ही कंत्राटदारांना वारंवार संपर्क केला. परंतु, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे असा पवित्रा घेतला. दुपारनंतर रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांची देखील कर्मचाऱ्यांनी भेट घेतली असून, पोलिसांना देखील लेखी तक्रार अर्ज दिल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
ससून प्रशासनाच्या वतीने कंत्राटदार आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आहे. कर्मचाऱ्यांशी जबाबदारी कंत्राटदारांची आहे. परंतु, येत्या काळात “सीएसआर’च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करणार आहे.
– डॉ. मुरलीधर तांबे, अधिष्ठाता, ससून रुग्णालय